चॅरिटी प्रीमियम लीग २०२५ अंतर्गत आयोजित सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवात धर्मादाय आयुक्तालय, पुणे तर्फे महाराष्ट्राचे महागायक मोहम्मद अयाज यांना विशेष मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला.
धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर (पुणे) आणि संभाजी ठाकरे (अमरावती) यांच्या हस्ते मोहम्मद अयाज यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे धर्मादाय उपआयुक्त डॉ. राजेश परदेशी, सहाय्यक आयुक्त रेश्मा पुनसे, पी. पी. चव्हाण, राहुल मामू तसेच एमआयटी युनिव्हर्सिटीचे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
संगीताच्या सुरेल स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध
या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात मोहम्मद अयाज यांनी एकाहून एक सरस गीते सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुरेल आवाजाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. या विशेष सन्मानाबद्दल त्यांनी एमआयटी युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त अमोग कलोटी यांचे आभार मानले. "हा सन्मान माझ्या कलेवर प्रेम करणाऱ्या रसिक श्रोत्यांना समर्पित आहे. त्यांच्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे," असे भावनिक उद्गार मोहम्मद अयाज यांनी काढले.
संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल
मोहम्मद अयाज यांनी आपल्या गायन कौशल्याच्या जोरावर 'साम गुरुकुल' महागायक विजेतेपद पटकावत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. त्यांच्या याच योगदानाची दखल घेत धर्मादाय आयुक्तालय, पुणे तर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या सन्मानाने त्यांची जबाबदारी अधिक वाढली असून, पुढेही उत्कृष्ट संगीत रसिकांसमोर सादर करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. धर्मादाय आयुक्तालयाच्या वतीने दिलेला हा सन्मान संगीत क्षेत्रातील कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मान्यवरांनी व्यक्त केले.