"कोणतीही व्यक्ती नावाने तिच्या आपल्या स्मरणात राहते; तसेच गाणे हे त्याच्या शब्दांमुळे स्मरणात राहते. आज शब्दच पोकळ झाले असून त्यांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळेच गाण्यांचे बोल लक्षात राहत नाहीत. शब्द मनाला भिडणारे असतील तर रसिक नक्कीच ते लक्षात ठेवतील," असे मत प्रसिद्ध गायक हरिहरन यांनी सोमवारी व्यक्त केले.
हरिहरन यांच्या संकल्पनेतून 'सोल इंडिया' या विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन पुण्यात २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणार आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी व्हायोलिन अकादमीचे संस्थापक पं. अतुलकुमार उपाध्ये आणि 'स्वरझंकार'चे संचालक राजस व तेजस उपाध्ये उपस्थित होते. 'या महोत्सवात विविध संगीत परंपरा सादर होणार असून, स्वतः हरिहरन यांच्यासह शंकर महादेवन, सुरेश वाडकर, नीलाद्री कुमार, गुलाम नियाज खाँ, राहुल देशपांडे, प्रियांका बर्वे, पृथ्वी गंधर्व आदी कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.
धार्मिक स्थळांमधील पेहरांवाबद्दल भाष्य करताना परंपरांचे पालन व्हावे आणि मंदिरसंहिता पाळली गेली पाहिजे, अशी अपेक्षा हरिहरन यांनी व्यक्त केली. 'कुंभमेळ्यात गायनासाठी निमंत्रण मिळाले असून त्यासाठी काही वेगळ्या रचनादेखील तयार केल्या आहेत. माझी ९० वर्षांची आईदेखील माझ्यासोबत असेल,' असेही त्यांनी सांगितले.