भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये समांतर चित्रपटांचे बीज रुजविणारे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर समांतर चित्रपट पोहोचविणारे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज दुपारी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या मित्रमंडळींसह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर आणि अनेक चाहते उपस्थित होते.
बेनेगल यांचे काल संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. आज दुपारी तिरंग्यामध्ये लपेटलेले त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यानंतर विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत तीन कैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली.
त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ गीतकार आणि दिग्दर्शकगुलजार, अभिनेते नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक-शहा, अभिनेते बोमन इरागी, कुलभूषण खरबंदा, ज्येष्ठ गायिका इला अरुण, ज्येष्ठ संवाद आणि पटकथा लेखक जावेद अख्तर, अभिनेता सचिन खेडेकर, श्रेयस तळपदे, दिव्या दत्ता, कुणाल कपूर आणि रजीत कपूर यांच्यासहित अन्य काही मंडळी उपस्थित होती. समांतर चित्रपट बनविणारे एका महान व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेल्याची भावना यावेळी सगळ्यांनी व्यक्त केली.
कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी वाहिली श्रद्धांजली
श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली वाहताना गीतकार गुलजार म्हणतात, “त्यांनी चित्रपट क्षेत्रात एक क्रांती घडवली, आणि ते त्या बदलाच्या अशी लाट, अशी क्रांती पुन्हा कोणीही आणू शकणार नाही. आपण त्यांना खूप काळपर्यंत आठवत राहू आणि त्यांच्याबद्दल खूप काळपर्यंत बोलत राहू.”
अभिनेता अनुपम खेर श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप देताना म्हणतो, “दिग्गज दिग्दर्शक श्याम बेनेगल हे भारतीय चित्रपट क्षेत्रातील कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञांसाठी खऱ्या अयनि तारणहार होते. त्यांनी कथा वेगळ्या पद्धतीने मांडल्या, 'मंडीं' या चित्रपटाच्या वेळी मी त्यांच्याकडे भूमिका मागण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी ते म्हणाले होते. की या चित्रपटात तुझ्यासाठी काही ठोस भूमिका नाही. तू लहान भूमिका करावी, असे मला वाटत नाही. थोडा थांब. कदाचित काही मोठे तुझ्यासाठी येईल. जेव्हा 'सारांश' तयार झाला, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता. श्याम बाबू, अलविदा. तुमच्या प्रतिभा आणि उदारतेबद्दल खूप खूप आभार.”
अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणते, “श्याम बेनेगल यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्यांच्या चित्रपटांनी केवळ कथा सांगितल्या नाहीत तर समाज, प्रामाणिकपणा आणि मानवतेचे प्रतिबिंब दाखवले. चित्रपटाविषयीची त्यांची नितांत आवड आणि आशयघन कथा सादर करण्याची त्यांची निष्ठा अनेक पिढ्यांना, ज्यात मी देखील आहे, प्रेरणा देणारी ठरती, त्यांची कलाकृती नेहमीच अमर राहील, सर, आपण कायम आमच्या स्मरणात आहात.”
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली वाहताना म्हणतात, “चित्रपटसृष्टीतील आणखी एक महान व्यक्तिमत्त्व आपण गमावले. श्याम बेनेगल यांचे निधन झाले. त्यांना प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली.”
दिग्दर्शक करण जोहर म्हणाला, “अविश्वसनीय प्रतिभेला आकार देणाऱ्या कयांबद्दल आणि चित्रपटांच्या सीमारेषा बदलल्याबद्दल आणि भारतीय चित्रपट अभिमान निर्माण केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.”
दिग्दर्शक सुभाष घई यांनीदेखील श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात, “भारतीय समांतर चित्रपटाचे महानायक श्याम बेनेगल आपल्यातून निघून गेले. त्यांनी आपल्याला चित्रपट कलेची नठी शिकवण, प्रेरणा आणि व्याख्या दिली. २००६ पासून 'व्हिसलिंग बूड्स' मधील सर्व चित्रपटनिर्मिती अभ्यासक्रमांचे ते मार्गदर्शक आणि संस्थापक सदस्य होते. आम्ही नेहमीच आपले प्रेम आणि कृतज्ञतेने स्मरण करू.”
अभिनेता रणदीप हुडा म्हणतो, “श्याम बेनेगल हे जरी आता आपल्याबरोबर नसते, तरी त्यांचे अविस्मरणीय चित्रपट त्यांना कायम आपल्यासोबत जिवंत ठेवतील, त्यांच्या चित्रपटांमार्फत त्यांनी अनेकांच्या जीवनाला प्रेरणा दिली. ज्यात मी देखील आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी संधी दोन वेळा हुकली. ते दयाळू, सौम्य व विचारशील होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यांचे प्रिय काम सुरू ठेवले होते. बेनेगल साहेब, तुमचे खूप आभार!”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter