बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान याचे प्रत्येक चित्रपट चाहते डोक्यावर उचलून घेतात. शाहरुखने गेल्या काही वर्षांत बॉलीवूडला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यात अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटांसह अनेक कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळाली आहे. बॉलीवूडमध्ये ९०च्या काळात प्रचंड गाजलेल्या एका चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
२००४ मध्ये प्रदर्शित झालेला फराह खान दिग्दर्शित 'मैं हू ना' या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार फराह खान आणि शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रोडक्शन टीमसह सिनेमाच्या स्क्रीप्टवर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शाहरूखचे चाहते सुद्धा प्रचंड खुश आहेत. अशीही माहिती मिळत आहे की, 'मैं हू ना-२' साठी फराह खानने एक खास स्टोरी लिहिली आहे. त्याला शाहरुखची देखील पसंती मिळाली आहे. मात्र, यावर शाहरुख किंवा फराह खान यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
'मैं हू ना' च्या पहिल्या भागातील दमदार कथेने आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसह झायेद खान, अमृता राव, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, सतीश शाह, बिंदू, बोमन इराणी, कबीर बेदी, नसीरुद्दीन शाह आणि किरण खैर हे कलाकार या महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.