फ्रान्समध्ये शाहरुखच्या नावाचे सोन्याचे नाणे!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अभिनेता शाहरुख खानने प्रचंड मेहनत आणि कष्टाच्या जोरावर आज बॉलिवूमध्ये स्वतःचं नाव कमावलंय. शाहरुखच्या सिनेमांची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. इतकंच नव्हे विविध भूमिकांनी शाहरुखही लोकांचं प्रेम मिळवतो. शाहरुखला आजवर राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध सन्मान मिळाले आहेत. अशातच शाहरुखला आणखी एक सन्मान मिळणार आहे. त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आल्याचे समोर आले असून जागतिक स्तरावर असा मान मिळवणारा तो एकमेव भारतीय कलाकार ठरला आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लोकप्रिय ग्रेविन म्युझियममध्ये शाहरुखच्या नावाचे सोन्याचे नाणे आहे, त्यावर त्याचे चित्र आणि नाव छापलेले आहे. हे नाणे २०१८ मध्ये जारी करण्यात आल्याची माहिती आहे. एका चाहत्याने हा या नाण्याचा फोटो शेअर केला होता आणि आता या नाण्याचा फोटो व्हायरल होतो आहे. शाहरुखचे चाहते यानंतर सोशल मीडियाद्वारे आनंद व्यक्त करत आहेत. सेईन नदीच्या काठी वसलेल्या ग्रँड्स बॉलेवार्ड्समध्ये 'द ग्रेविन म्युझियम' हे लोकप्रिय वॅक्स म्युझियम आहे.

अलीकडेच सोशल मिडिया पेजवरुन शाहरुखचे चित्र असणारे हे नाणे शेअर करण्यात आले, त्यानंतर याबद्दल चर्चा रंगली. यावर चाहत्यांच्या असंख्य कमेंटही आल्या आहेत. अनेकांनी हा क्षण अभिमानास्पद असल्याची कमेंट केली आहे. काहींनी शाहरुखला जगातील सर्वात मोठा स्टार संबोधले, तर काहींनी अशी टीकाही केली ही अशी नाणी पैसे देऊन कोणीही बनवू शकतो.

या वॅक्स म्युझियममध्ये शाहरुखचा मेणाचा पुतळाही आहे. याशिवाय इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, झेक रिपब्लिक, थायलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि भारत याठिकाणी असणाऱ्या वॅक्स म्युझियममध्ये शाहरुखचा मेणाचा पुतळा आहे.