महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सिद्दीकी यांच्या जवळचा असलेल्या सलमानसोबतही असे कृत्य होण्याची शक्यता असल्याने त्याच्या सुरक्षेवर आता मुंबई पोलिसांच्या कडक नजर आहे.
सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला वाय-प्लस सुरक्षा देण्यात आली असून, आता पोलीस एस्कॉर्ट वाहनही सलमान खानच्या वाहनांच्या मागे असणार आहे. याशिवाय सर्व शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण असलेला हवालदारही त्यांच्यासोबत असणार आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडे टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आणि सलमानचे सिद्दीकी यांच्याशी असलेले जवळचे संबंध या हत्येचे कारण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. सलमान खानला गेल्या काही वर्षांत लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेक धमक्यांना सामोरे जावे लागले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान जिथे जिथे शूटिंगसाठी जाईल, तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला त्याच्या ठावठिकाणाबद्दल माहिती दिली जाईल आणि त्यानंतर पोलिसांची एक टीम शूटिंग लोकेशनवर लक्ष ठेवेल.
पनवेल येथील सलमान खानच्या फार्महाऊसवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, फार्म हाऊसच्या आत आणि बाहेर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी लागू केली आहे, जेणेकरून फार्महाऊसभोवती फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करता येईल. फार्महाऊसकडे जाणारा एकच रस्ता आहे आणि तो एका गावातून जातो.
या वर्षी जूनमध्ये मुंबई पोलिसांनी सलमान खानला त्याच्या फार्महाऊसजवळ मारण्याचा कट हाणून पाडला होता. लॉरेन्स बिश्नोई टोळीने खानला त्याच्या फार्महाऊसजवळ त्यांची कार थांबवून एके-४७ रायफलने गोळ्या घालून ठार मारण्याची योजना आखली होती.
बाबा सिद्दीकी यांची शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी निर्मल नगर येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर रविवारी मुंबईतील बडा कब्रिस्तान येथे पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप या हत्येतील दोन आरोपींना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार नावाचा तिसरा शूटर सध्या फरार आहे.