सलमान खानचा पुतण्या आणि अल्विरा-अतुल अग्निहोत्री यांचा मुलगा अयान अग्निहोत्री सध्या चर्चेत आहे. त्याच्या युनिव्हर्सल लॉज या म्युझिक सिंगलला दुबईत भव्य लॉन्च मिळालं आणि विशेष म्हणजे, खुद्द सलमान खाननेही त्याला जोरदार पाठिंबा दिला, मात्र अयानच्या एका अजब खुलाशामुळे सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे!
एका मुलाखतीत अयानने आपल्या तिन्ही मामांबद्दल-सलमान, अरबाज आणि सोहेल खान-खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, त्याने सलमान खानला 'जोकर' तर अरबाज खानला 'स्ट्रिक्ट' असल्याचं म्हटलं! अयानच्या मते, सलमान खान हा कुटुंबातील सर्वांत मजेदार व्यक्ती असून, तो नेहमीच प्रॅक्स खेळतो, लोकांना घाबरवतो आणि पाय ओढतो. त्याचबरोबर त्याने अयानला एक महत्त्वाचा सल्लाही दिला- "लोक काय म्हणतात, याचा विचार करू नकोस. तुला जे हवं तेच कर."
सोहेल खानविषयी बोलताना अयान म्हणाला की, लहानपणी सोहेल मामाच त्याचा दुसरा वडील होता. तो नेहमी त्याला, अरबाजचा मुलगा अरहानला आणि निरवानला सहलीला घेऊन जायचा, मात्र अरबाज मामाची इमेज थोडी 'स्ट्रिक्ट' असल्याचंही त्याने सांगितलं. अयानच्या या खुलाशावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सलमानचे चाहते त्याला नेहमी 'भाई' म्हणून ओळखतात, पण घरात तो 'मस्तीखोर' आहे, हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.