अनेकदा खलनायक, पोलिस, नवाब किंवा हाय क्लास पात्रांमधून आपली वेगळी छाप पाडणाऱ्या सैफ अली खाननं आता आणखी एक धाडसी निर्णय घेतलाय. 'ओमकारा' मधील लंगड्या त्यागीपासून ते 'सेक्रेड गेम्स' मधील सरताज सिंगपर्यंत सैफने भूमिका निवडताना जी प्रयोगशीलपणा दाखविली त्याच धाटणीची आणखी एक सशक्त भूमिका त्याच्या कारकीर्दीत जोडली जाणार आहे.
यावेळी तो एका नेत्रहीन व्यक्तीची भूमिका साकारणार असून, प्रेक्षकांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रियदर्शन यांच्या आगामी थ्रिलर चित्रपटात सैफ ही भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात होते. त्याला अलीकडेच एका मुलाखतीत सैफने स्वतः दुजोरा दिला आहे. हा चित्रपट मल्याळम सुपरहिट 'ओप्पम'चा हिंदी रिमेक असणार आहे.
यावेळी बोलताना सैफ म्हणतो, "प्रियदर्शन सरांसोबत काम करणं ही एक खास संधी आहे. ही भूमिका माझ्यासाठी जबाबदारीची आणि भावनिकदृष्ट्या गुंतविणारी आहे." प्रियदर्शन व सैफ अली खानची ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने इंडस्ट्रीमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर्कपासून वर्कशॉप्सपर्यंत सर्व तयारी सुरू असून, लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे. अंध व्यक्तीचं वास्तवदर्शी चित्रण करण्यासाठी सैफ विशेष ट्रेनिंग घेत आहे. या धाडसी भूमिकेमधून सैफ पुन्हा एकदा आपली अभिनयक्षमता सिद्ध करणार आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter