अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याला आता रुग्णालयातून मंगळवारी १९ जानेवारीला डिस्चार्ज मिळाला आहे. सैफला १६ जानेवारीला मध्यरात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १७ जानेवारीला पहाटे त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केल्यानंतर सैफ गंभीर जखमी झाला होता. आरोपीने त्याच्या पाठीमध्ये खुपसलेल्या चाकूचा तुकडा अडकला होता. हा अडीच इंचाचा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन बाहेर काढला. त्यानंतर त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते.
सैफ सुखरुप घरी परतल्यामुळे खान कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. तो घरी परतल्यानंतर त्याचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले आहे. सोशल मीडियावर सैफ अली खानच्या वांद्रे पश्चिम येथील घराचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सैफच्या स्वागतासाठी घरच्या मंडळींना संपूर्ण अपार्टमेंटला आकर्षक रोषणाई केलेली पाहायला मिळते आहे. त्याच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर सैफ अली खानच्या घराचे हे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.