अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी सीसीटीव्हीतील संशयीताचा चेहरा व अटक आरोपीचा चेहरा यांचा पडताळणी अहवाल पोलिसांना मिळाला आहे. अहवालानुसार आरोपीचे छायाचित्र व सीसीटीव्हीतील व्यक्तीचा चेहरा एकाच व्यक्तीचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणी आरोपी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम (३०) विरोधात पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागला आहे.
अहवालात काय म्हटले आहे?
आरोपी हल्ला करून पसार झाल्यावर २.३३ मिनिटांनी त्याचा चेहरा तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता. या चेहऱ्याचा फोटो घटनेच्या दिवशी विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झालेल्या आरोपीच्या प्रतिमांशी जुळतो असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सैफ राहत असलेल्या वांद्रे पश्चिमेतील सतगुरु शरण इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत हल्लेखोराचा चेहरा आणि आरोपी हा वेगळा असल्याचे आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी शरीफुलची फेस रेकग्निशन चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.
आरोपी न्यायालयीन कोठडीत
पोलिसांना न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा (एफएसएल) अहवाल शुक्रवारी प्राप्त केला. त्यानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचा फोटो आणि विविध सीसीटीव्ही फुटेजमधील हल्लेखोराची छायाचित्रे एकाच व्यक्तीची असल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. शरीफुलची २९ जानेवारी रोजी पोलिस कोठडी संपली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
सीसीटीव्हींची पडताळणी
पोलिसांनी जवळपास ४६० सीसीटीव्ही फुटेजची यासाठी पडताळणी केल्याची माहिती आहे. शरीफुलच्या हाताच्या ठशाचे नमुने आणि घटनास्थळावरील हल्लेखोराच्या बोटांच्या ठशांशी जुळत नसल्याच्या आरोपावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे फेस रेकग्निशन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
सैफवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलचा फेस रेकग्निशन अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यामुळे आता हे स्पष्ट झालंय की, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती हा शरीफुलच आहे. पोलिसांसाठी हा अहवाल आता एक भक्कम पुरावा ठरणार आहे. शहजादला अटक करण्यात आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाली होती, आता त्याला पूर्णविराम बसणार आहे.