बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणवले जाणारे राजेश खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीत यशाचं शिखर पाहिलं तसंच सगळ्यात वाईट दिवसही पाहिले. मुली त्यांच्या नावाचं कुंकू लावायच्या. त्यांचे चाहते प्रचंड होते. निर्माते कायम त्यांच्या घराबाहेर लाइन लावून असायचे. पण अशी एक वेळ आली जेव्हा राजेश यांचं स्टारडम संपलं. त्यांना पैसे कमावण्यासाठी चक्क बी ग्रेड चित्रपटात काम करावं लागलं. राजेश यांचा वाईट काळ सुरू झाला आणि त्या दिवसात निर्मात्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. मात्र या सगळ्यात फक्त राजेश खन्ना यांची चूक नव्हती असं वक्तव्य अभिनेत्री मुमताज यांनी केलं होतं. त्यांनी यासाठी निर्मात्यांना जबाबदार ठरवलं.
मुमताज यांनी ११ व्या वर्षी अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं. त्यात त्यांची जोडी राजेश खन्ना यांच्यासोबत जास्त जमली. त्यांनी एकत्र १० चित्रपटात काम केलं. त्यामुळे राजेश यांचं स्टारडम त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्यांचा डाउनफॉलदेखील. मुलाखतीत मुमताज यांनी राजेश यांच्या वाईट काळावर भाष्य केलं.
रेडीफला दिलेल्या मुलाखतीत मुमताज म्हणाल्या, 'आम्ही जे काही स्टार आहोत ते तुमच्या प्रेमामुळे आहोत. तुझ्या प्रेमाशिवाय आम्ही काही नाही. राजेश खन्ना यांचा दोष पूर्णपणे नव्हता. मला आठवतं जेव्हा त्यांची प्रचंड क्रेझ होती. सगळे त्यांना पाहण्यासाठी वेडे होते.'
त्या पुढे म्हणाल्या, 'माझा बंगला त्यांच्या बंगल्याच्या अगदी जवळ होता. मी मोठमोठे निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्या चमच्यांसारखे वागताना पाहिले आहेत. त्यांची हांजी हांजी करताना पाहिलं आहे. त्यांची मैत्रीण अंजू महेंद्रू रात्रभर अशा निर्मात्यांची उठबस करायची. पहाटे तीनपर्यंत ती त्यांना जेवण वाढत असायची.
शम्मी कपूरच्या घरीही मी अशाच रात्रभर सुरू असलेल्या पंगती पाहिल्या. राजेश पाहुण्यांवर भरपूर पैसा खर्च करत असे. पण त्यांनी अभिनेत्याला तितक्या चित्रपटात घेतलं नाही. जोपर्यंत त्यांच्याकडे पैसे होते सगळे त्यांच्या मागेपुढे करायचे. पैसे संपले तेव्हा त्यांच्याकडे कुणी पाहतही नव्हतं.'