हाय-ऑक्टेन अॅक्शन, गूढ द्विस्ट आणि भव्य स्टारकास्टसाठी ओळखली जाणारी 'रेस' फ्रेंचायझी ही बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय थ्रीलर मालिकांपैकी एक आहे. 'रेस' (२००८) आणि 'रेस २' (२०१३) मध्ये सैफ अली खानने मुख्य भूमिका साकारती होती, तर 'रेस ३' (२०१८) मध्ये सलमान खानचा सहभाग चर्चेचा विषय ठरला होता.
प्रत्येक भागात प्रेक्षकांना नवा सस्पेन्स, नवे चेहरे आणि अचंबित करणाऱ्या कथा पाहायला मिळाल्या. आता रेस ४ 'च्या तयारीची बातमी पुन्हा एकदा चर्चेत असून, त्यात सैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राची निवड झाली असल्याचे संकेत मिळाले आहेत. टिप्स फिल्म्स'चे निर्माता रमेश तौरानी यांनी स्पष्ट केलं आहे की 'रेस ४' अजून स्क्रिप्टिंगच्या टप्यात असून, सध्या फक्त सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्राशीच चर्चा सुरू आहे . "आतापर्यंत कोणत्याही अन्य पुरुष अथवा महिला कलाकारांशी संपर्क साधलेला नाही", असं त्यांनी सांगितलं आहे.
तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि अधिकृत घोषणेची वाट पाहण्याचं आवाहन केलं आहे. शर्वरी वाघ, राकुल प्रीत सिंह आणि मानुषी छिल्लर या अभिनेत्रींची नावं चर्चेत असली, तरी कोणताही कास्टिंग निर्णय झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सैफचे पुनरागमन आणि सिद्धार्थसारख्या नव्या चेहऱ्यांची जोड़ी रेस ४ साठी नवं समीकरण तयार करू शकते. चित्रपटाचे दिग्दर्शक अद्याप निश्चित झालेले नाहीत, अधिकृत घोषणा पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे.