'चौहदवीं का चाँद हो', 'ओ हसीना जुल्फों वाली', 'उड़े जब जब जुल्फे तेरी', 'परदा है परदा' अशा सदाबहार हिंदी चित्रपटगीतांनी पुणेकरांनी 'रफी' मय सायंकाळ अनुभवली. या गाण्यांच्या साथीने प्रसिद्ध अभिनेते, निवेदक अन्नू कपूर यांनी अफलातून किस्से आणि आठवणींसह दिग्गज गायक मोहम्मद रफी यांचा जीवनप्रवास उलगडला.
निमित्त होते, 'सुहाना समा विथ अन्नू कपूर' या मैफिलीचे. सकाळ माध्यम समूह, 'फर्माईशे' आणि तेज अॅडव्हर्टायझिंग यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कारकिर्दीला सलाम करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोहम्मद रफी यांच्या आठवणी आणि त्यांनी गायलेली गाणी असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
अन्नू कपूर यांनी मोहम्मद रफी यांच्या सुरुवातीच्या आयुष्याची पार्श्वभूमी विशद करून कार्यक्रमाला सुरुवात केली. रफी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, सांगीतिक जडणघडण, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवेश याविषयीचे किस्से सांगताना विविध संगीतकारांसह रफी यांचे झालेले वाद विवाद, मात्र ते मिटवून पुन्हा एकत्र केलेले काम, याच्याही अनेक अपरिचित आठवणी सांगितल्या. रफी यांनी वेगवेगळ्या संगीतकारांसाठी गायलेली गाणी धवल चांदवडकर, रसिका गानू आणि आशिष श्रीवास्तव यांनी सादर केली. रसिकांनीही प्रत्येक गाण्याला उत्स्फूर्त दाद देत आणि काही गाण्यांच्या ओळी गुणगुणत मैफिलीचा आनंद घेतला.
अन्नू कपूर आणि सर्व गायकांनी एकत्रितपणे सादर केलेल्या 'सवेरे वाले गाडी से चले जायेंगे' या गाण्याने मैफिलीची सांगता झाली. या गायकांना कीबोर्डवर विवेक परांजपे, केदार परांजपे व दर्शना जोग, बासरीवर नीलेश देशपांडे, गिटारवर विशाल थेलकर, व्हायोलिनवर श्रुती भावे, सतारवर कल्याणी देशपांडे, ऑक्टोपॅडवर अभिजित भदे, ढोलकवर केदार मोरे आणि तबल्यावर विक्रम भट यांनी साथसंगत केली. संगीत संयोजन विवेक परांजपे व केदार परांजपे यांचे होते. ध्वनिव्यवस्था नीलेश यादव यांची; तर प्रकाशयोजना तेजस देवधर यांची होती.