भारतासारख्या महाकाय खंडप्राय देशामध्ये आजवर भिन्न संस्कृती, विचारधारा आणि भिन्न मतप्रवाह हे एका छत्राखाली गुण्यागोविंदाने नांदले आहेत. इतक्या वैविध्यपूर्णतेनंतरही देश अखंडित राहण्यामागे असणारा एक सूक्ष्म धागा म्हणजे या मातीत रुजलेल्या नानाविध संप्रदायांमधील भक्ती परंपरेचे समान सूत्र. या संप्रदायांतील विविध संतांकडून मिळालेल्या समता, बंधुत्व आणि सर्वधर्मसमभावाच्या शिकवणीतून समाजाचे प्रबोधन आजवर होत आले आहेत. संत शिरोमणि कबीर यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात, संत साहित्याच्या माध्यमातून समाजाला नवा विचार देण्याचा प्रयत्न बैठक फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. याच उद्देशाने ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून पुणे शहरात ‘कबीर फेस्टिवल’चे आयोजन करत आहे.
पुणे कबीर फेस्टिवल या उपक्रमाच्या संकल्पनेविषयी बोलताना बैठक फाऊंडेशनच्या सीईओ दाक्षयानी आठल्ये म्हणाल्या, “आमची संस्था शहरातील विविध शाळांमध्ये गायन आणि वादनाचे कार्यक्रम घेत असते. शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचवण्यासाठी शहराच्या प्रमुख ठिकाणी सुद्धा आम्ही हे कार्यक्रम घेतो. परंतु आमच्या कामातून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की, शास्त्रीय संगीताकडे लोकांचा कल जरा कमी आहे. तसेच संत साहित्याबद्दल अतिशय कमी लोकांना माहिती असते. याच उद्देशाने आम्ही पुण्यात कबीर फेस्टिवल सुरु करण्याचे ठरवले.”
याविषयी त्या पुढे म्हणतात, “संत साहित्य आणि पारंपारिक संगीत हे एकमेकांमध्ये कुठेतरी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही विचार केला की पुणे कबीर फेस्टिवल सारख्या कार्यक्रमात संगीतविषयक उपक्रम होतीलच परंतु संत साहित्याकडे देखील लोक वळतील. याच विचारातून कबीर फेस्टिवलची सुरुवात झाली. विविध प्रांतातील, विविध धर्मातील, विविध भाषा बोलणारे संत आपल्या भूमीत होऊन गेले. या संतांनी समाज आणि व्यक्तीच्या उन्नतीसाठी जे काही विचार मांडले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायचे माध्यम हे कबीर फेस्टिवल असणार आहे.”
असे असणार ‘पुणे कबीर फेस्टिवल २०२५’चे स्वरूप
यंदाचा पुणे कबीर फेस्टिवल १ आणि २ फेब्रुवारीला होणार आहे. दरवर्षी एका विशिष्ट थीमवर आधारित हा महोत्सव पार पडतो. तर यंदा ‘माया’ या थीमवर आधारित हा महोत्सव असणार आहे. या दोन दिवसांच्या काळात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. ४ प्रकारांमध्ये विभागलेल्या या महोत्सवातील पहिला कार्यक्रम हा प्रभातफेरीचा असणार आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून ही प्रभातफेरी निघणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी दुसरा कार्यक्रम हा समाजमंच असणार आहे. या कार्यक्रमात सर्वांना सहभाग घेऊन सादरीकरण करता येणार आहे. तसेच या सत्रात राज्यस्तरीय गायन आणि नृत्य स्पर्धा देखील होणार आहेत.
२ फेब्रुवारीला सकाळी होणारा तिसरा कार्यक्रम हा सत्संगचा असणार आहे. जीवितनदी या संस्थेसोबत एकत्र येत शहरातील नदीकाठी हा कार्यक्रम घेतला जातो. यंदा हा कार्यक्रम राम आणि मुळा नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी पार पडणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी चौथा कार्यक्रम हा औंध-पाषाण रस्त्यावरील आयसर एमपीसी थेटर इथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री प्रल्हाद सिंह टिपानिया, कथाकार विनय वाराणसी आणि मंदार करंजकर हे आपली कला सादर करणार आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -