कंदाहार विमान अपहरणावर आधारित 'आयसी मोनिका शेरगील ८१४ कंदाहार हायजॅक' नावाच्या वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची नावे भोला आणि शंकर अशी ठेवण्यात आली होती. यावर समाज माध्यमातून प्रचंड टीका झाल्यानंतर केंद्र सरकारने नेटफ्लिक्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीत पाचारण केले होते. अखेर सरकारने खरडपट्टी काढल्यानंतर संबंधित वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची खरी नाव दाखवण्याचे 'नेटफ्लिक्स' ने मान्य केले आहे.
काठमांडू वरून दिल्लीकडे येणाऱ्या आयसी ८१४ या विमानाचे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी १९९९ मध्ये अपहरण केले होते. अमृतसरमार्गे हे विमान अफगाणिस्तानातील कंदाहारला नेण्यात आले होते. जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याच्यासह अन्य काही दहशतवाद्यांना सोडण्याच्या बदल्यात विमानातील प्रवाशांची सुटका करण्यात आली होती. या घटनेवर आधारित 'आयसी ८१४-कंदाहार हायजॅक' नावाची वेबसिरीज नेटफ्लिक्सवर दाखवली जात आहे. मात्र यातील दहशतवाद्यांचे पात्र साकारणाऱ्यांना भोला, शंकर अशी हिंदू देवतांची नावे देण्यात आली होती. ही बाब चव्हाट्यावर आल्यानंतर निर्मात्यांवर मोठ्याप्रमाणावर टीका झाली होती.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट विभागाच्या प्रमुख मोनिका शेरगील यांना दिल्लीत पाचारण केले होते. सरकारने घेतलेल्या झाडाझडतीनंतर नेटफ्लिक्सने चूक कबूल करत दहशतवाद्यांची खरी नावे दाखविण्याचे मान्य केले. तसेच सिरीजच्या सुरुवातीला दाखविल्या जाणाऱ्या 'डिस्क्लेमर' मध्ये सुधारणा केली जाईल.
दहशतवाद्यांची खरी नावे आणि त्यांचे खरे कोड दाखविले जातील, असे नेटफ्लिक्सकडून मान्य करण्यात आले. विमान अपहरण करणाऱ्यांना दयाळू दाखविण्याचा प्रयत्न सिरीजमध्ये करण्यात आला आहे. याला असंख्य प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता.
मोनिका शेरगील यांची सारवासारव
'देशात कथा सांगण्याची समृद्ध परंपरा आहे आणि आम्ही या कथा तसेच त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधित्वाला प्रदर्शित करण्यासाठी कटिबद्ध आहोत," अशी सारवासारव मोनिका शेरगील यांनी माहिती-नभोवाणी मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या भेटीनंतर केली.
लोकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नाही
मालिकेमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला नाही. अशा विषयांवर मालिका प्रदर्शित करत असताना जास्त संवेदनशील राहणे गरजेचे असल्याचे 'नेटफ्लिक्स'ला सांगण्यात आले, असे माहिती आणि नभोवाणी मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. यावर भविष्यात मालिका बनवत असताना लोकांच्या भावना लक्षात घेतल्या जातील, असे आश्वासन शेरगील यांनी दिल्याचे समजते.
'बॉयकॉट नेटफ्लिक्स'ची सुरू होती मोहीम
वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची नावे भोला, शंकर, बर्गर, चीफ, डॉक्टर अशी दाखवण्यात आली होती. प्रत्यक्षात पाकिस्तानच्या हरकत उल मुजाहिदीनच्या इब्राहिम अतहर, शाहीद अख्तर सय्यद, एस. अहमद काझी, झरूर मिस्त्री आणि शाकीर नावाच्या दहशतवाद्यांनी विमान अपहरण केले होते. हिंदू समाजातील व्यक्ती दहशतवादी असल्याचा ठपका ठेवण्यासाठीच जाणूनबुजून दहशतवाद्यांची नावे हिंदू ठेवण्यात आल्याचा आरोप समाज माध्यमांतून करण्यात आला होता. या मुद्द्यावरून 'बॉयकॉट नेटफ्लिक्स' ची मोहीम सुरू झाली होती. या वेबसिरीजमध्ये जे प्रमुख कलाकार आहेत, त्यात नसरुद्दीन शहा, विजय वर्मा, दिया मिर्झा, पंकज कपूर, अमृता पुरी, मनोज पाहवा, पत्रलेख, कुमुद मिश्रा, आदित्य श्रीवास्तव आणि अरविंद स्वामी यांचा समावेश आहे.