८० च्या दशकात आपल्या सिनेकरियरमध्ये जावेद अख्तर यांनी ‘अंदाज’, ‘यादों की बारात’, ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘शोले’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. ते एक सुप्रसिद्ध आणि प्रख्यात गीतकार असून माजी खासदार देखील आहेत. कायमच चर्चेत राहणारे गीतकार जावेद अख्तर आता एका पुरस्कारामुळे चर्चेत आले आहेत. जावेद अख्तर यांना समष्टी फाऊंडेशनतर्फे ‘नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या सोहळ्या दरम्यान ७ मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. साहित्य आणि भाषाशास्त्रात ५० वर्षांच्या दिलेल्या योगदानासाठी प्रख्यात गीतकार व विचारवंत जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार, आयपीएस अधिकारी संदिप तामगाडगे यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार, प्रसिद्ध साहित्यिका डॉ. श्यामल गरूड यांना समष्टी गोलपीठा पुरस्कार, डॉ. अमोल देवळेकर यांना समष्टी निर्मिक पुरस्कार, तर ॲड. दिशा वाडेकर यांना समष्टी मूकनायक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
‘सारं काही समष्टीसाठी’ या सोहळ्याचे यंदा आठवं वर्ष आहे. ११ आणि १२ एप्रिल रोजी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत हा दोन दिवसीय सोहळा रंगणार आहे. या दोन दिवसांत कला, साहित्य, सिनेमा, सामाजिक आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
समष्टी फाउंडेशनने गेली आठ वर्षं सतत प्रयत्न केले आहेत की समाजातल्या वास्तव प्रश्नांना भाषा, गीत संगीत आणि कलाकृतींचा वापर करून अभिव्यक्त करण्याची संधी तळागाळातील प्रत्येकाला उपलब्ध व्हावी. ही परंपरा जपताना समष्टी पुरस्कार म्हणजे संवेदनशीलतेच्या आणि जबाबदारीच्या गाठी बांधणाऱ्या लोकांचा सन्मान आहे. सर्व विचारप्रवण नागरिकांना आणि माध्यम प्रतिनिधींना या पर्वसोहळ्याला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण दलित पँथरचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. स्वप्नील ढसाळ यांनी सर्वांना केलं आहे.