भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने काल (दि.९) हैदराबाद येथे एका खास इफ्तारचे आयोजन केले होते. रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात आयोजित या कार्यक्रमाला क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांसह राजकीय नेत्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या इफ्तारचे आयोजन सिराजच्या हैदराबादेतील निवासस्थानी करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी प्रथम नमाज पठण केले. त्यानंतर एकत्रितपणे रोजा सोडला. सिराजने स्वत: सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट संघातील काही सहकारी खेळाडू आणि राजकीय नेते उपस्थित होते. याशिवाय, सिराजच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रही या सोहळ्यात सहभागी झाले होते.
हैदराबाद हे शहर तेथील खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. अशातच रमजानच्या खास प्रसंगी सिराजने हैदराबादमध्ये इफ्तारचे आयोजन केल्याने पाहुणे मंडळींना खमंग मेजवानीचा आस्वाद घेता आला. कार्यक्रमात विशेष पारंपरिक पदार्थांचा समावेश होता. खजूर, बिर्याणी, शीरखुर्मा आणि इतर स्वादिष्ट पदार्थांनी पाहुण्यांची मने जिंकली. सिराजने स्वत: सर्व व्यवस्था पाहिली आणि प्रत्येकाला आपलेपणाची भावना जाणवेल याची काळजी घेतली. सध्या सोशल मीडियावर सिराजच्या या इफ्तारची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.