मिथुन : रुपेरी पडद्यावरील 'दादा' माणूस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 5 d ago
मिथुन चक्रवर्ती
मिथुन चक्रवर्ती

 

मृणाल सेन दिग्दर्शित 'मृगया' या पहिल्याच चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता... तरीही मुंबईत आल्यावर त्याला पुढील अनेक वर्षे चित्रपट मिळवण्यासाठी झगडावे लागले. ओळखीपाळखीतून काही चित्रपट मिळाले. 'गरीब निर्मात्यांचा अमिताभ' अशी नकोशी बिरुदावली घेऊन तो लढत राहिला. नृत्यकला दाखवत तो 'डिस्को डान्सर' झाला व तरुणांच्या गळ्यातील ताईतही बनला. मात्र कथानक नसलेल्या व तुफान मारधाडीच्या चित्रपटांचा नायक अशीच त्याची ओळख बनत राहिली... नंतर 'अग्निपथ'सारख्या चित्रपटामध्ये तो अमिताभसमोरच ठामपणे उभा राहिला आणि स्वामी विवेकानंदांवरील चित्रपटात त्याने चक्क रामकृष्ण परमहंस यांची भूमिका साकारली. प्रेक्षकांच्या नजरेतून हळूहळू दूर जात असताना व उतारवयात काही चांगल्या भूमिका साकारत असताना त्याला मानाचा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' मिळाल्याची घोषणा झाली आणि त्याचे नाव पुन्हा लोकांच्या ओठांवर आले.... हे नाव आहे अभिनेता मिथुन चक्रवर्ती. 

हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सत्तरचे दशक तसे मोठ्या घडामोडींचे ठरले होते. राजेश खन्नाची सद्दी संपत अमिताभ बच्चन हे नाव चित्रपटसृष्टीत स्थापित होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्याचवेळी 'मृगया'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला मिथुन मुंबईत दाखल झाला आणि सर्वसामान्य शरीरयष्टीचा हा काळा-सावळा तरुण चित्रपटसृष्टीतमध्ये कामे शोधू लागला. एका बंगाली चित्रपटाची बेगमी पाठीशी असलेल्या या युवकाला कोणीच काम द्यायला तयार नव्हते. मिथुनने बीएस्सीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमधील शिक्षणही पूर्ण केले होते. तिथे त्याची सहकारी होती जया भादुरी. जया व अमिताभच्या मदतीने चित्रपटांत काही संधी मिळेना या आशेने तो जयाकडे गेला. अगदी मिळेल ते काम करण्याची त्याची तयारी होती. जयाला आपल्या या एकेकाळच्या सहकाऱ्याची स्थिती पाहवली नाही व तिनं काही निर्मात्यांकडे शब्द टाकला. मिथुनचे नशीब पालटले. त्याला चक्क तीन चित्रपटांची ऑफर आली व त्यातला एक होता 'सुरक्षा'.

या चित्रपटातील त्याची रांगडी अॅक्शन दृश्ये, हालचालींमधील कमालीचा वेग व अभिनयाचा वेगळा बाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि मिथुनकडे निर्मात्याची रांग लागली. त्यानंतरचे त्याचे चित्रपट एकाच बाजाचे आणि अगदीच 'उन्नीस बीस' होते. मात्र, तो इंडस्ट्रीतील व्यग्र कलाकार म्हणून ओळखला जाऊ लागला, 'डिस्को डान्सर' हा बी. सुभाष दिग्दर्शित चित्रपट १९८२मध्ये प्रदर्शित चित्रपटानं मिथुनचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तरुणाई त्याची नृत्ये, कपडे, हेअर स्टाइलची 'फॅन' बनली आणि मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही. 

शौकीन, स्वामिदादा, हम से हैं जमाना, घर एक मंदिर, कसम पैदा करणे वाले कि, गुलामी, प्रेम प्रतीक्षा, हि त्यांच्या चित्रपटाची नावे वानगीदाखल घेतली, तरी मिधुनचा दबदबा पुढील अनेक वर्षे कायम राहिल्याचे लक्षात येते. त्याच्या गाजलेल्या चित्रपटांपेक्षा पडेल चित्रपटांची संख्या अधिक असेलही, मात्र त्याचं नाव प्रेक्षकांच्या मनावर कायमच गारुड करीत राहिले. अंडरवर्ल्डच्या धमक्यांना कंटाळून त्याने मुंबईतला आपला मुक्काम उटीमध्ये हलवला व तिथूनच काम करायला सुरुवात केली. करिअरच्या शेवटच्या टप्प्यात त्यानं 'गुरू', 'ओ माय गॉड', 'ताश्कंद फाइल्स', 'काश्मीर फाइल्स' अशा चित्रपटांतून आपला ठसा उमटवला. टीव्हीवरच्या अनेक नृत्यांच्या कार्यक्रमांचा परीक्षक म्हणूनही तो हजेरी लावत असतो.

चित्रपटसृष्टीतील मिथुन चक्रवर्तीच्या कारकिर्दीला ५० वर्ष होत आली आहेत. आज पन्नाशी ओलांडलेल्या पिढीच्या भुवया कदाचित मिथुनला 'फाळके पुरस्कार' मिळाला म्हणून उंचावतील आणि केवळ सायकलच्या मागून गोळ्या झाडणाऱ्या मिथुनचे 'रील' पाहिलेल्या तरुणाईला आश्चर्याचा धक्काही बसेल. काहींना त्यात पक्षीय राजकारणाचा वासही येऊ शकतो... मात्र, मिथुनसारख्या निष्ठेने चित्रपटसृष्टीची सेवा करणाऱ्या कलाकारांचा गौरव व्हायला हवा, हेही खरे.