वसंत पंचमीच्या दिवशी ‘हर कंठ में भारत’ रेडियो उपक्रमाचा शुभारंभ

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आकाशवाणीच्या प्रसारण केंद्रातील पं. रविशंकर संगीत स्टुडिओमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘हर कंठ में भारत’ या नवीन रेडियो मालिकेची सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम विशेषत: भारतीय शास्त्रीय संगीताच्या विविध पैलूंना सादर करण्यासाठी तयार केला आहे.

संस्कृती मंत्रालय आणि लोक सेवा प्रसारक आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या समारंभाची सुरुवात सकाळी १०:३० वाजता झाली. संस्कृती मंत्रालयाचे सचिव अरुणीश चावला, प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या प्रसंगी आकाशवाणीच्या महानिदेशक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौड, संस्कृती विभागाच्या संयुक्त सचिव अमिता प्रसाद आणि दूरदर्शनच्या महानिदेशक कंचन प्रसाद यांनी द्वीप प्रज्वलन केले.

या प्रसंगी स्वागत भाषणात आकाशवाणीच्या महानिदेशक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौड यांनी वसंत पंचमीच्या दिव्य महत्त्वावर प्रकाश टाकला. ‘हर कंठ में भारत’ या कार्यक्रमाच्या संकल्पनेबद्दल आणि प्रसारणाच्या महत्त्वाबद्दल त्यांनी भाष्य केले. तसेच त्यांनी आशा व्यक्त केली की हा सहयोगात्मक प्रयत्न नक्कीच फलदायी ठरेल. यावेळी प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी आकाशवाणीच्या ऐतिहासिक आणि शांतीदायक भूमिकेबद्दल भाष्य केले. 

विशेष म्हणजे ‘हर कंठ में भारत’ ही नवीन रेडियो कार्यक्रम मालिका १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज ९:३० वाजता भारतभरातील २१ स्टेशन्सवर एकाच वेळी प्रसारित होणार आहे. याद्वारे जवळपास देशाच्या सर्व भागांचे प्रभावी कव्हरेज होणार आहे.