बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने आपल्या मुलगा आर्यन खानच्या दिग्दर्शकीय पदार्पणाची अधिकृत घोषणा केली आहे. ‘द बॅस्टर्ड्स ऑफ बॉलीवूड’ असे या शोचे नाव असणार असून, तो रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार केला जात आहे. नेटफ्लिक्सवरील ‘Next on Netflix’ या कार्यक्रमात शाहरुखने ही माहिती दिली.
नेटफ्लिक्समध्ये नोकरी देण्याचा होता विचार, पण…
या कार्यक्रमात शाहरुख खानने एक मोठा खुलासा केला. सुरुवातीला त्याला आर्यनला अमेरिकेतील नेटफ्लिक्समध्ये कोणाला तरी असिस्ट करण्यासाठी नोकरी मिळवून द्यायची होती. पण कोविड महामारीमुळे त्याचे भारतात परतणे झाले आणि त्याने स्वतःच लेखन सुरू केले."कोविड नसता, तर मी नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सरँडोस आणि कंटेंट हेड बेला बजारीयांशी चर्चा करून आर्यनला तिथे काम मिळवून दिले असते. पण तो भारतात परतला आणि त्याने स्वतःचा शो लिहिला," असे शाहरुख म्हणाला.
गौरी खानची निर्मिती, सुप्रसिद्ध लेखकांचा सहभाग
‘द बॅस्टर्ड्स ऑफ बॉलीवूड’ हा शो बिलाल सिद्दीकी आणि मानव चौहान यांनी सह-निर्मित केला आहे, तर गौरी खान ही याची निर्माता आहे. याआधी ‘बर्द ऑफ ब्लड’, ‘क्लास ऑफ 83’, ‘लव्ह हॉस्टेल’, ‘डार्लिंग्स’ यांसारखे अनेक शो रेड चिलीजने नेटफ्लिक्ससाठी तयार केले आहेत.
शाहरुखचे आर्यन आणि सुहानासाठी विशेष प्रार्थना
शाहरुख खानने कार्यक्रमात आपल्या मुलांसाठी एक खास प्रार्थना केली. तो म्हणाला, "मी ज्या प्रकारे प्रेक्षकांचे प्रेम मिळवले, त्यातील फक्त ५०% जरी आर्यन आणि सुहानाला मिळाले तरी ते त्यांच्यासाठी खूप मोठे असेल."
सुहान खानने २०२३ मध्ये झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. ती लवकरच ‘किंग’ या चित्रपटात शाहरुख खान, अभिषेक बच्चन आणि अभय वर्मा यांच्यासोबत झळकणार आहे.