कपूर खानदान मोदींच्या भेटीस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

 

दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता राज कपूर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल अभिनेत्री करिना कपूर हिने त्यांचे सोशल मीडियावरून आभार मानले आहेत. तसेच पंतप्रधानांसोबतचा कपूर कुटुंबीयांचा फोटोही शेअर केला आहे.

'आग', 'आवारा', 'बरसात', 'श्री ४२०' आणि 'बॉबी' यासारखे उत्कृष्ट चित्रपट देणारे राज कपूर यांची १४ डिसेंबरला १००वी जयंती आहे. 'आमचे आजोबा, राज कपूर यांच्या विलक्षण जीवनाचे आणि वारशाचे स्मरण करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केले, याचा आम्हाला अत्यंत आदर आणि आनंद आहे. या खास क्षणासाठी मोदीजींचे आभार. तुमचे प्रेम, लक्ष आणि पाठिंबा हा आमच्यासाठी मोलाचा होता,' असे करिना हिने पंतप्रधानांसोबतच्या कुटुंबाच्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर साहनी, नीतू कपूर, रिमा जैन, करिष्मा कपूर, आलिया भट्ट, सैफ अली खान, आदर जैन, अरमान जैन आणि अनिसा मल्होत्रा यांच्यासह कपूर कुटुंबीयांनी मंगळवारी नवी दिल्लीत मोदी यांची भेट घेतली आणि पंतप्रधानांना राज कपूर चित्रपट महोत्सवासाठी आमंत्रित केले. या महोत्सवाला मोदी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा कपूर कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

१३ ते १५ डिसेंबरला ३४ शहरांमध्ये १०१ चित्रपटगृहांमध्ये 'पीव्हीआर आयएनओएक्स लिमिटेड' आणि 'फिल्म हेरिटेज फाउंडेशनने' हा महोत्सव आयोजित केला आहे. "आजोबांची कलात्मकता, दूरदृष्टी  आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाची १०० गौरवशाली वर्षे आम्ही साजरी करत आहोत. आम्हाला लाभलेल्या या वारशाचा सन्मान करतो. हा वारसा आम्हाला आणि येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील," असेही करिना कपूरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter