गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यातला वाद आता संपुष्टात आला आहे.एक खास पोस्ट शेअर करत कंगनाने हा कायदेशीर वाद आता संपल्याचे सांगितले आहे.
जावेद अख्तर आणि कंगना रणौत २८ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता त्यांच्या वकिलांसह वांद्रे कोर्टात पोहोचले. तिथे त्यांनी मॅजिस्ट्रेट आशिष आवारी यांच्यासमोर पाच वर्षे जुने कायदेशीर प्रकरण संपवले आहे.
कंगनाने पोस्टमध्ये काय म्हटले?
कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर जावेद अख्तर यांच्याबरोबर एक फोटो शेअर केला आणि लिहिले आहे की, “आज जावेद जी आणि मी मध्यस्थीद्वारे आमचे कायदेशीर प्रकरण (मानहानी प्रकरण) सोडवले आहे. जावेद जी यांनी मोठं मन ठेवून हे प्रकरण सोडवले. तसेच मी दिग्दर्शन करत असलेल्या माझ्या पुढच्या चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासही त्यांनी होकार दिला आहे.”
नेमकं प्रकरण काय?
कंगना रनौत व जावेद अख्तर यांच्यातील ही कायदेशीर लढाई २०२० मध्ये सुरू झाली होती. कंगना आणि हृतिक रोशनचे २०१६ मध्ये ब्रेकअप झाला. त्यामुळे दोघांमध्ये बराच वाद झाला होता. रोशन कुटुंबाच्या जवळ असलेल्या जावेद अख्तर यांनी हृतिक रोशनची माफी मागण्यास सांगितलं होतं, असा दावा कंगनाने केला होता.
२०२१ मध्ये एका मुलाखतीत कंगना म्हणाली होती की, २०१६ मध्ये झालेली बैठक त्यांना अपमानजनक वाटली. त्यामुळेच त्यांनी तिच्याविरुद्ध मानहानीचा दावा करीत न्यायालयात धाव घेतली आहे. कंगना रणौतनेदेखील जावेद अख्तर यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र, अख्तर यांच्यावरील कारवाईला दिंडोशी सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर जवळपास पाच वर्षांनी हे प्रकरण मिटले आहे.