लोकप्रिय बॉलिवूड गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी शबाना आझमी हिच्याशी दुसरा विवाह केला. ते आनंदात संसार करत आहेत. मात्र त्यांचा पहिला विवाह हनी इराणी यांच्याशी झाला होता. मात्र त्यांचं लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जावेद यांनी आपलं लग्न तुटण्याचं कारण सांगितलं आहे. आपण खूप दारू प्यायचो म्हणून आपलं लग्न तुटलं यात आपल्या पत्नीचा काहीच दोष नाही असं ते म्हणाले. जावेद यांनी सपन वर्मा याच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं.
जावेद अख्तर तरुणांना दारूचं व्यसन टाळण्याचा सल्ला देत म्हणाले, 'मी दारू पिऊन बराच वेळ वाया घालवला आहे. मी मद्यपी होतो. ३१ जुलै १९९१ ला मी दारू पिणं सोडलं. मला वाटतं की मी किमान 10 वर्षे फक्त दारू पिऊन वाया घालवली आहेत. तो वेळ मी इतर काही सकारात्मक आणि सर्जनशील कामासाठी वापरू शकलो असतो. मी तरुणांना सल्ला देईन की, तुम्ही दारू पिणं सोडा, कारण मी माझ्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा दारूशिवाय मी माझ्या आयुष्यात कोणतीही मोठी चूक केलेली नाही.
पहिलं लग्न तुटण्याची खंत
79 वर्षीय जावेद पुढे म्हणाले, 'माझ्या पहिल्या लग्नाच्या अपयशाबद्दल मला खेद वाटतो. ते टिकलं नाही. ते वाचवता आलं असतं. पण ती माझी बेजबाबदार वृत्ती होती, माझी दारू पिण्याची सवय होती… जेव्हा तुम्ही नशेत असता तेव्हा तुम्ही विचार न करता निर्णय घेता, काही अशा गोष्टींबद्दल तुम्ही भांडायला लागता, ज्या फार महत्वाच्या नसतातच. या सर्व चुका माझ्याकडून झाल्या आहेत. माझं लग्न माझ्या चुकीमुळे तुटलं.
शबानासोबत केलं दुसरं लग्न
फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही जावेद यांच्या पहिल्या बायकोची मुले आहेत. म्हणजे त्यांची आणि हनी इराणीची मुलं. त्यानंतर त्यांनी शबाना आझमी याच्याशी लग्न केलं. हे लग्न 1984 मध्ये झालं. दोघांनाही मूलबाळ नाही. तसेच त्यांनी कोणतंही मूल दत्तक घेतलेलं नाही. जावेद नुकतेच 'अँग्री यंग मॅन' या माहितीपटात दिसले होते. त्यात सलीम खानही होते. यात जेव्हा दोघांनी इंडस्ट्रीवर राज्य केलं तेव्हाच्या कथा आहेत. दोघांनी मिळून 24 चित्रपट केले, त्यापैकी 22 ब्लॉकबस्टर ठरले. नम्रता राव यांनी त्यांच्या माहितीपटाचे दिग्दर्शन केलं
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter