नुकतीच १८ व्या जयपूर साहित्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आमेर येथील हॉटेल क्लार्क्स येथे हा सोहळा सुरु आहे. यावेळी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे देखील उपस्थित होते. यावेळी जावेद अख्तर यांनी इंग्रजी भाषेविषयीचा सल्ला लोकांना दिला आहे. यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, "आयटी आणि विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात, आपल्याले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, परंतु इंग्रजीची तुलना आपल्या मातृभाषेशी कधीच होऊ शकत नाही."
जयपूर साहित्य महोत्सवाच्या एका सत्रात आपल्या "ज्ञान सीपियां: पर्ल्स ऑफ विजडम" या पुस्तकाचे विमोचन करत असताना जावेद अख्तर म्हणाले, "जर तुम्हाला तुमची मातृभाषा येत नसेल, तर तुम्ही तुमच्या मुळांपासून वेगळे होत आहात. जर मुलं आपली मातृभाषा विसरतात, तर ते आपली संस्कृती आणि परंपरा देखील विसरू शकतात. कोणतीही भाषा केवळ संवादाचे साधन नाही, ती आपल्या संस्कृती, परंपरेचा आणि सातत्याचा वाहक आहे. जर तुम्ही मुलांना त्यांच्या मातृभाषेपासून दूर केले, तर तुम्ही त्यांना त्यांच्या संस्कृती आणि इतिहासापासून देखील वेगळे करत आहात."
पुढे ते म्हणाले, "आज भारतात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणावर खूप जोर दिला जात आहे. आम्ही आमच्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये पाठवू इच्छितो. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलंही यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. मी इंग्रजी भाषेच्या महत्त्वाला नाकारत नाही, पण मला असे वाटते की, दुसरी भाषा शिकताना आपली मातृभाषा विसरू नये."
जावेद अख्तर यांनी बहुभाषावादावर (एकापेक्षा जास्त भाषा शिकणे) जोर दिला. जिथे एखादी व्यक्ती आपली मातृभाषा जपून ठेवत इंग्रजीत निपुण होऊ शकते. ते म्हणाले, "आजच्या जगात आपण इंग्रजीशिवाय जगू शकत नाही. विशेषत: आयटी क्षेत्रात याचा जास्त प्रभाव दिसून येतो. पण माझी इच्छा आहे की आपली मुलं बहुभाषिक बनावीत. त्यांनी त्यांची मातृभाषा शिकत, इतर भाषाही शिकाव्यात. जेव्हा आपण आपली मातृभाषा विसरतो, तेव्हा आपण आपल्या मुळांशी संबंध तोडतो."