ऑस्करकडून शबाना आझमी आणि राजामौली यांचा गौरव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 11 d ago
शबाना आझमी आणि एस.एस. राजामौली
शबाना आझमी आणि एस.एस. राजामौली

 

ऑस्कर पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्सने यंदा ४८७ जणांना संस्थेच्या नवीन सदस्यत्वासाठी निमंत्रण दिले आहे. मंगळवारी रात्री उशिरा संस्थेच्या संकेतस्थळावर ही यादी जाहीर करण्यात आली. निमंत्रण दिलेल्या मान्यवरांमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील शबाना आझमी, ‘आरआरआर’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्यासह अकरा भारतीय कलाकारांचा समावेश आहे.

चित्रपट क्षेत्रामध्ये विशेष योगदान देणाऱ्या जगभरातील कलाकारांना ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्सच्या वतीने या संस्थेच्या सदस्यत्वासाठी निमंत्रण पाठविण्यात येते. चित्रपट क्षेत्रात दिलेल्या योगदानाच्या आधारे सदस्यत्वासाठी निमंत्रित करण्यासाठीच्या कलाकारांची नावे निश्‍चित करण्यात येतात असे या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

या भारतीयांना निमंत्रण
मागील ५० वर्षांपासून भारतीय चित्रपट सृष्टीसह आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये कसदार अभिनयाच्या जोरवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शबाना आझमी यांना ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्सने संस्थेचे सदस्यत्व स्वीकारण्यासाठी निमंत्रण पाठविले आहे.

अभिनेत्यांसाठी असलेल्या विभागात सहभागी होण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शकांसाठी असलेल्या विभागाच्या सदस्यत्वासाठी, २०२३मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळविणाऱ्या ‘आरआरआर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या रिमा दास यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील वेशभूषाकार रामा राजामौली, शीतल शर्मा, दिग्दर्शक रितेश सिदवानी, दिग्दर्शक हेमल त्रिवेदी, सिनेमॅटोग्राफर रवी वर्मन, आनंद कुमार आणि गीतेश पांडे यांसह एकूण अकरा भारतीयांना सदस्यत्वासाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

हे कलाकार आहेत सदस्य
भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार हे ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्सचे सदस्य आहेत, यात प्रामुख्याने संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहेमान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, काजोल, विद्या बालन, आमीर खान, एकता कपूर यांचा समावेश आहे.