भारत पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ग्लोबल ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES) आयोजित करेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केलीय. ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान जगभरातील कलाकार दिल्लीत जमणार आहेत. देश आणि जगाच्या निर्मात्यांना वेव्हज जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असे मोदी म्हणाले. ते 'मन की बात' कार्यक्रमात बोलत होते.
या समिटचा मुख्य उद्देश जागतिक दर्जाची सामग्री तयार करण्यासाठी देशाची क्षमता प्रदर्शित करणे. तसेच सहकार्याला प्रोत्साहन देणे हा असेल. पंतप्रधान मोदींनी रविवारी त्यांच्या महिन्याच्या ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमात संबोधनात यासंदर्भात घोषणा केली. यावेळी त्यांनी WAVES समिटबद्दल सविस्तर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी WAVES ची तुलना दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी केली.
जगभरातील निर्माते दिल्लीत एकत्र येतील आणि त्यांची क्षमता दाखवतील. ही परिषद भारताला ग्लोबल कंटेंट क्रिएटरचं केंद्र बनवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल ठरेल. वेव्हजच्या तयारीसाठी तरुण क्रिएटर्सला एकत्र येण्याचं आवाहन केलंय. पंतप्रधान मोदींनी क्रिएटर अर्थव्यवस्थेत त्यांचा हातभार लागत असल्याचं सांगितलं. भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी त्याचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असं मोदी म्हणालेत.
तुम्ही प्रस्थापित कलाकार असाल किंवा तरुण निर्माते, किंवा तुम्ही प्रादेशिक सिनेमा किंवा बॉलिवूडशी संबंधित असाल. ॲनिमेशन, गेमिंग किंवा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये व्यावसायिक असाल. या परिषदेत येण्यासाठी सर्वांना आमंत्रण असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणालेत. मोदींनी मनोरंजन आणि सर्जनशीलता जगतातील लोकांना या परिषदेत येण्याचे आवाहन केले.
या शिखर परिषदेत गेमिंग, ॲनिमेशन, मनोरंजन तंत्रज्ञान, प्रादेशिक आणि मुख्य प्रवाहातील सिनेमांमध्ये भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला जाईल, असेही मोदी म्हणाले. राज कपूर यांनी त्यांच्या चित्रपटांद्वारे भारताची सॉफ्ट पॉवर वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर मोहम्मद रफी यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज पुढील पिढ्यांनाही मंत्रमुग्ध करेल.
याचबरोबर मोदींनी तेलुगू चित्रपटसृष्टीला पुढे नेणाऱ्या अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या योगदानाचेही कौतुक केले. त्यांनी भारतीय परंपरा प्रतिबिंबित करण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. तपन सिन्हा यांच्या जागरूक चित्रपटांचाही पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला. या लोकांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाला नवे आकार दिल्याचे मोदी म्हणाले.