एखादा चित्रपट हिट झाला की प्रेक्षकांना तो पुन्हा-पुन्हा पाहायचा असतो. याचा फायदा घेत सिनेनिर्माते लगेचच त्याचे सिक्वेल तयार करण्याच्या तयारीला लागतात. अशातच २०११ मध्ये प्रदर्शित झालेला'रॉकस्टार' या सुपरहीट सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याचे बोलले जात आहे. यावर दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी मोठी हिंट दिली आहे.
रॉकस्टारमधील रणबीर कपूरच्या 'जॉर्डन' या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. चित्रपटाची कथा आणि संगीत आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येईल का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. एका अहवालानुसार, इम्तियाज अलींनी एका मुलाखतीत 'रॉकस्टार २' बाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "कधीच 'नाही' म्हणू नये. एखादी नवीन आयडिया मिळाली आणि मला वाटले, की 'रॉकस्टार'ची कथा पुढे नेता येईल, तर नक्कीच विचार करू." रणबीर कपूरची 'रॉकस्टार' मधील अभिनयासाठी खूप प्रशंसा झाली होती. 'अॅनिमल' मध्येही त्याच्या भूमिकेत जॉर्डनसारखी झलक दिसली.
त्यामुळे जर 'रॉकस्टार २'च्या पटकथेने दमदार स्वरूप घेतले, तर तो पुन्हा या भूमिकेत दिसू शकतो, मात्र, मूळ चित्रपटात नरगिस फाखरीच्या व्यक्तिरेखेचा मृत्यू झाला होता, त्यामुळे ती या सीक्वेलमध्ये नसेल, असे दिसते. सध्या रणबीर कपूर 'अॅनिमल पार्क', 'लव्ह अँड वॉर' आणि 'रामायण' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम करीत आहे. 'रॉकस्टार २' बनविण्याचा निर्णय घेतला गेला, तर तो कधी येईल, हे पाहणे रंजक ठरेल.