इम्तियाज अली यांच्यासोबत दक्षिणेचा सुपरस्टार फहाद फासिल चित्रपटात काम करणार आहे.इम्तियाज अली हे नाव आज कोणत्याही ओळखीचे मोहताज नाही. आपल्या अनोख्या कथाकथन शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या इम्तियाज अलीने आतापर्यंत अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या चित्रपटांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अविस्मरणीय गाणी. ही गाणी आजही प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान राखून आहेत.
अलीकडेच एक महत्त्वाची बातमी समोर आली की दक्षिणेचा सुपरस्टार फहाद फासिल इम्तियाजच्या नवीन चित्रपटात काम करणार आहे. यामुळे सिनेसृष्टीत नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. त्याचबरोबर ख्रिसमसच्या निमित्ताने इम्तियाजने आपल्या आगामी चित्रपटाचे नाव 'द इडियट ऑफ इस्तंबूल' असल्याचे जाहीर केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना इम्तियाज म्हणाले की, "चित्रपटाबद्दलची घोषणा वेळेपेक्षा थोडी लवकर झाली आहे. मी बर्याच काळापासून या चित्रपटावर काम करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचे नाव 'द इडियट ऑफ इस्तंबूल' असेल. परंतु सध्या त्याच्या कथेवर आणि कास्टिंगवर चर्चा सुरू आहे."
इम्तियाज अलीचा शेवटचा चित्रपट अमर सिंग चमकीला हा होता, ज्यात दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात एका पंजाबी गायकाच्या जीवनाचे भावनिक चित्रण करण्यात आले होते. त्यातील ‘विदा करो’ हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता फहाद फासिल सध्या पुष्पा २ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकत आहे. या भूमिकेसाठी त्याला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे.