केमोथेरपीनंतर हिनाने कॅन्सरपीडितांना दिला 'हा' सल्ला

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
 हिना खान
हिना खान

 

अभिनेत्री हिना खानला काहीच दिवसांपूर्वी स्तनांच्या कर्करोगाचं निदान झालं. तिचा झालेला कर्करोग हा तिसऱ्या स्टेजचा असून या वेळी रुग्णाची अवस्था गंभीर असल्याचं सर्वसाधरणपणे मानलं जातं. पण याही परिस्थितीत न डगमगता हिना धीराने कॅन्सरशी लढा देतेय आणि पहिल्या किमोथेरपीनंतर तिने पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली. सोशल मीडियावर तिने याविषयीचे अपडेट शेअर केले.
 

पुन्हा जोमाने शूटिंगला सुरुवात

हिनाने तिच्या शूटिंग लोकेशनवरील एक व्हिडीओ पोस्ट करत एक खास पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या किमो सेशननंतर पुन्हा कामाला सुरुवात केल्याचं सांगितलं. तिचे सहकारी तिचा मेकअप करत असल्याचं यावेळी व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. तसंच तिने तिच्या गळ्यावर असलेल्या टाक्यांच्या खुणा लपवत असल्याचंही ती यावेळी म्हणाली. तिला त्रास होत असतानाही तिने आनंदाने पुन्हा एकदा काम सुरु केलं आणि पोस्टमधून कॅन्सरचा सामना करणाऱ्या अनेक लोकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला.

हिनाची कॅन्सरग्रस्तांसाठी खास पोस्ट

सोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये हिना म्हणते कि," माझ्या कॅन्सरच्या निदानानंतरचं हे माझं पहिलं काम...
तुम्ही जे बोलता ते करून दाखवणं खूप आव्हानात्मक असतं खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या आव्हानांचा सामना करत असता. म्हणून, जेव्हा तुमचा वाईट दिवस असतो त्यावेळी स्वतःला एक छोटी सुट्टी द्या. तुम्हाला ती गरजेची आहे. पण असं करतानाच जेव्हा तुमचा चांगला दिवस असतो तेव्हा तो जगायला विसरू नका. ते कितीही कमी येत असले तरीही ते भरभरून जगा. या दिवसांचं तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. तुमच्या आयुष्यात घडणारा बदल स्वीकारा, त्याला जवळ करा आणि त्याला तुमच्यात सामावून घ्या.
 
 
 
मला माझ्या चांगल्या दिवसांची वाट पाहायला आवडतं कारण त्या दिवशी मला जे आवडतं ते करायला मिळतं उदाहरणार्थ काम. मला माझं काम आवडतं. मी जेव्हा काम करते तेव्हा मी माझी स्वप्नं जगते आणि तिचं मला बळ देतात. मला कायम काम करायचं आहे. काही लोक त्यांच्यावर उपचार सुरु असतानाही कोणतीही अडचण न येता काम करतात आणि मी ही तशीच आहे. मी अशाच काही लोकांना गेल्या काही महिन्यांमध्ये भेटले आणि त्यांनी माझा दृष्टिकोन बदलला.

तुम्हाला सांगते कि, उपचारांसाठी मला कायम हॉस्पिटलमध्ये राहावं लागत नाही तर मला या आजाराचा सामना करणाऱ्या इतर लोकांनाही सांगायचं आहे कि या काळात काम करणं आपण स्वीकारुया. जर त्यांच्यात ती ताकद आहे आणि त्यांना त्यांचं काम खुश करतं तर त्यांना ते करू द्या.

आणि या आजाराचा सामना करणाऱ्या सगळ्या सुंदर लोकांना मला हेच सांगायचंय कि, ही तुमची गोष्ट आहे आणि हे तुमचं आयुष्य आहे. तुम्हाला तुमचं आयुष्य कसं घडवायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. कधीही हार मानू नका आणि जे तुम्हाला आवडतं ते करत राहा. तुमचं काम ही तुमची आवड जे काही असेल ती जपा. पण तुम्ही पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी स्वतःला वेळही द्या. कारण, जेव्हा तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करता ते तुम्हाला बरंही करतं. "
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter