सध्या मल्याळम सिनेविश्व महिला अत्याचाराच्या घटनांमुळे चर्चेत आहे. अनेक कलाकारांवर आरोप झाले आहेत तर काही कलाकार आता सिनेविश्वपासून आणि चर्चांपासून दूर राहत आहेत. तेथील आघाडीचा अभिनेता फहाद फासिल आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय.
'पुष्पा' सिनेमामुळे फहादचं बॉलिवूडमध्येही नाव झालं. त्यात त्याने साकारलेला खलनायक गाजला आणि आता फहाद नवीन सिनेमात काम करत असल्याची चर्चा आहे.
'अमर सिंह चमकीला' या बायोपिकनंतर दिग्दर्शक इम्तियाज अली आता नव्या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. हा नवीन सिनेमा प्रेमकहाणी असल्याचं म्हटलं जात आहे. पिंकविला या वेब साईटने दिलेल्या वृतानुसार, या सिनेमात फहाद मुख्य भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातंय. या सिनेमानिमित्त फहाद आणि इम्तियाज यांच्या भेटीगाठी सुरु असून या सिनेमाविषयी ते चर्चा करत आहेत. जर ही चर्चा यशस्वी झाली तर या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल.
पिंकविलाच्या सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, इम्तियाज त्याच्या आगामी सिनेमासाठी फाहादचा विचार करत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या अनेक भेटीगाठी झाल्या आहेत. चित्रपट आणि कथेबाबत त्यांच्यात एकमत असून इम्तियाजच्या आधीच्या सिनेमांप्रमाणेच हा सिनेमाही एक प्रेमकथाच असणार आहे. या सिनेमासाठी अद्याप अभिनेत्रीचा शोध सुरु आहे.
२०२५ च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये या सिनेमांचं शूटिंग सुरु करण्याची दिग्दर्शकाची योजना आहे. सध्या या सिनेमाच्या कथेवर काम सुरु असून लवकरच सिनेमाचं संगीत आणि प्री-प्रॉडक्शनचं काम सुरु होणार आहे.
या आधी फाहादला विशाल भारद्वाज यांनी एका हिंदी सिनेमाची ऑफर दिली होती आणि त्याने होकारही दिला पण नंतर विशाल भारद्वाजने दुसऱ्याच एका अभिनेत्याबरोबर सिनेमा केल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. तर फहादला इम्तियाजचा अमर सिंह चमकीला हा सिनेमा खूप आवडला होता.
फहादचा आवेशम हा सिनेमा खूप गाजला. तर लवकरच तो पुष्पा २ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.