इम्रान हाश्मीला अभिनय नव्हे तर 'या' क्षेत्रात करायचे होते करियर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी
बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी

 

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीने नुकतेच एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. आपल्या दमदार भूमिका आणि इंडस्ट्रीतील खास स्थानासाठी ओळखला जाणारा इम्रानने सांगितले की, त्याला कधीच कॅमेऱ्यासमोर यायचे नव्हते, उलट त्याला कॅमेऱ्यामागे काम करायचे होते. अभिनय हा त्याच्या आयुष्याचा  भाग कधीच नव्हता, असे त्याने सांगितले आहे. 

अलीकडेच यूट्यूबर रणवीर अल्लाहबादिया याच्या पॉडकास्टवर इम्रानने खुलासा केला की, त्याला कधीच अभिनेता व्हायचे नव्हते. तो महल की, "मला वाटते, मी अभिनय शोधला नाही, तर तोच मला सापडला. आयुष्यात असे अनेक सुखद योगायोग घडतात. मी वेगळ्या मार्गाने जाणार होतो, पण मला ही संधी मिळाली आणि मी अभिनेता झालो. सुरुवातीला मला अभिनय अजिबात सोपा वाटला नाही. जर तुम्हाला अभिनेता व्हायचेच असेल, तर गोष्टी सोप्या होतात. पण तयारी नसेल, तर चित्रपटसृष्टी आणि त्यातल्या नव्या गोष्टी खूप आव्हानात्मक ठरतात. माझ्यासोबत तसेच झाले."

२००३ मध्ये ‘फूटपाथ’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या इम्रानने सांगितले की, सुरुवातीचे काही वर्षे संकोच आणि आत्मविश्वासाच्या अभावाने भरलेली होती. त्याची खरी आवड नेहमीच चित्रपटनिर्मितीच्या तांत्रिक बाजूंमध्ये होती. इम्रान म्हणतो, "मला कधीच वाटले नाही की मी कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी तयार आहे. मला व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ग्राफिक्समध्ये करिअर करायचे होते, म्हणजे सगळं कॅमेऱ्यामागचं काम. एका टप्प्यावर मी दिग्दर्शक व्हायचे स्वप्न पाहिले होते. मला कधीच अभिनेता व्हायचे नव्हते. अभिनयाच्या जगात स्वतःला सावरायला मला काही वर्षे लागली. पण हे सगळं छान होतं. एक प्रकारे स्वतःला शोधण्याचा तो अनुभव होता. लोक तुम्हाला ओळखत नसतानाही तुमच्यावर प्रेम करतात, ही भावनाही खूप वेगळी आहे."

इम्रानचा पहिला स्टारडमचा अनुभव
इम्रानने आपल्या सुरुवातीच्या काळातील एक आठवणही सांगितली, जेव्हा त्याने पहिल्यांदा स्टारडमचा अनुभव घेतला. "मेट्रो सिनेमात ‘फूटपाथ’चा पहिला शो पाहायला गेलो होतो. मला वाटले होते की लोक मला ओळखतील आणि तसेच झाले. मध्यंतरात कॅन्टीनमध्ये अर्धे थिएटर बाहेर आले आणि तिथे मला पहिल्यांदा गर्दीचा अनुभव आला. तेव्हा वाटले ही लोकप्रियता छान आहे. त्याआधी मी विचार करत होतो की हा एक चित्रपट करेन आणि मग मुंबई सोडून अमेरिकेत जाईन, तिथे ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स शिकेन."