L&T अध्यक्षांच्या विधानावर दीपिकाची टीका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
अभिनेत्री दीपिका पदुकोण, ‘एल अँड टी’चे चेअरमन एस एन सुब्रह्मण्यन
अभिनेत्री दीपिका पदुकोण, ‘एल अँड टी’चे चेअरमन एस एन सुब्रह्मण्यन

 

लार्सन आणि टर्बो कंपनीचे चेअरमन एस एन सुब्रह्मण्यन यांनी कामाच्या ठिकाणचे वर्क कल्चर आणि कर्मचाऱ्यांची रविवारची सुट्टी यावरून केलेल्या वक्तव्यावरून सगळीकडे वादंग निर्माण झाला आहे. रविवारचीही सुट्टी कर्मचाऱ्यांनी घेऊ नये असं मत त्यांनी मांडलं, यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणने यावर प्रतिक्रिया देत तिचा संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर दीपिकाची प्रतिक्रिया चर्चेत आहे.

लार्सन अँड टर्बोचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी नुकत्याच एका चर्चासत्राला हजेरी लावली होती. यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांना अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेल्या लार्सन आणि टर्बोमध्ये आजही कर्मचाऱ्यांना शनिवारी काम का करावं लागतं ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं कि,"रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चाताप आहे. कारण मी रविवारी काम करतो. तुम्ही घरी बसून काय करता ? किती वेळ तुम्ही तुमच्या पत्नीकडे बघत बसणार? त्यापेक्षा ऑफिसला या आणि काम सुरु करा." असं वक्तव्य त्यांनी केलं.

Image
 

सोशल मीडियावर हे वक्तव्य व्हायरल होताच दीपिकाने हे स्टेटमेंट रिपोस्ट करत तिचा संताप व्यक्त केला. "इतक्या वरिष्ठ पदांवरील अधिकारी अशी विधान करताना वाचून धक्का बसला" अशी प्रतिक्रिया तिने दिली. इतकंच नाही तर हे वक्तव्य व्हायरल होताच एल अँड टी कंपनीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत वक्तव्यावरही तिने प्रतिक्रिया दिली. 'त्यांनी आता हे प्रकरण आणखी बिघडवलंय' अशी कमेंट दीपिकाने केली.
 
Image

एल अँड टीने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये चेअरमनच्या वक्तव्याचं समर्थन करण्यात आलं. देशाला पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देशाची प्रगती करायची असेल तर सर्वांगीण प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि आमच्या चेअरमननी त्यांचे हेच विचार बोलून दाखवले असं त्यांनी परिपत्रकात म्हटलं. यावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter