काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटी झाले व्यक्त

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 2 Months ago
आलीय भट्ट, प्रियांका चोप्रा आणि मृण्मयी देशपांडे
आलीय भट्ट, प्रियांका चोप्रा आणि मृण्मयी देशपांडे

 

जम्मू काश्मीरमधील रियासीमध्ये रविवारी यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार तर 33 जण जखमी झाले. या हल्ल्यावर संपूर्ण भारतातून निषेध व्यक्त करण्यात येत असून मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधून सेलिब्रिटीजनी सोशल मीडियावर पोस्ट करत या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

सेलिब्रिटींनी व्यक्त केला निषेध
आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, रिचा चड्ढा, वरुण धवन, अथिया शेट्टी या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचा निषेध व्यक्त केला. आलियाने पोस्ट करत म्हंटलं कि,"हे खूप वाईट आहे. या हल्ल्यात बळी गेलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांप्रती मी सहानुभूती व्यक्त करते. निरागसतेविरुद्ध होत असलेली हिंसा ही माणुसकीला घातक आहे"

तर प्रियांका चोप्राने,"हे सगळं सुन्न करणार आहे. निरपराध यात्रींवर हल्ला करणं खूप वाईट आहे. सामान्य नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले कशासाठी ? या हिंसेचा जगभरात सामना करणं खूप कठीण आहे." अशी पोस्ट शेअर केली.

तर परिणीती चोप्राने,"रियासी मधून येणारे फोटो बघून मला खूप दुःख होतंय. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सगळ्या नागरिकांच्या कुटूंबाला यातुन सावरण्याची शक्ती मिळो आणि या दुःखातून ते लवकरात लवकर बाहेर पडो." अशी पोस्ट शेअर केलीये.

मराठी इंडस्ट्रीनेही व्यक्त केला निषेध
मराठी इंडस्ट्रीमधीलही अनेक कलाकारांनी पोस्त शेअर करत निषेध व्यक्त केला. गायत्री दातार, मृण्मयी देशपांडे, गौरी नलावडे, जान्हवी किल्लेकर, मीरा जगन्नाथ, चैत्राली गुप्ते,अमृता देशमुख, सुरुची आडारकर आणि अनेक कलाकारांनी ऑल आईज ऑन रियासी च्या पोस्ट शेअर करत या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला. 

काय घडलं नेमकं?
वैष्णोदेवीला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेली बसवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. ही बस प्रवाशांना घेऊन शिव खोरी गुंफा मंदिराकडे दर्शनासाठी जात होती. या हल्ल्यात नऊ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे आणि ३३ प्रवासी जखमी झाले. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. स्थानिक आणि पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त प्रवाशांची मदत केली असून अजून तपासकार्य सुरु आहे.