सध्या बॉलिवूड सिनेमात अदा शर्माची प्रमुख भूमिका असलेला सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 'द केरला स्टोरी'च्या ट्रेलरने इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे.
केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकिय विश्वातही बरिच चर्चा सुरु झाली. हा चित्रपट रिलिजपुर्वीच वादात अडकला आहे.
आता द केरला स्टोरी वर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिलाय. याशिवाय सिनेमात एक मोठा बदल करण्यात आला आहे.
अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी अभिनीत या चित्रपटात ३२००० तरुणींना इस्लामिक स्टेट (IS) मध्ये सामील होण्यासाठी आणि सीरिया आणि अफगाणिस्तान सारख्या देशांमध्ये कसे ब्रेनवॉश करण्यात आले हे दाखवण्यात आले होते.
चित्रपटाला वास्तविक जीवनातील सत्य घटनेवर आधारित अशी टॅगलाईन दिली गेली होती. अखेर प्रचंड वाद झाल्यावर द केरला स्टोरी सिनेमात मोठा बदल करण्यात आलाय.
पत्रकार मोहम्मद झुबेरने चित्रपटाच्या कॅप्शनमधील बदलांकडे सर्वांचे लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. “केरळमधील ३२००० महिलांच्या हृदयद्रावक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या कथांमधून! लवकरच येत आहे!’ असं कॅप्शन याआधी द केरला स्टोरी च्या टिझरला दिलं गेलं होतं.
— Mohammed Zubair (@zoo_bear) May 2, 2023
पण आता हे बदलून ‘केरळच्या विविध भागातील ३ तरुणींची सत्यकथा’. प्रोपगंडा चित्रपटाच्या टीझरने आता यूट्यूबवर ‘द केरळ स्टोरी’ चे वर्णन बदलले आहे.”अशी पोस्ट मोहम्मद झुबेरने केली आहे. अशाप्रकारे प्रचंड वाद ओढवल्यानंतर ३२००० मुलींनी धर्मांतर केल्याच्या वादानंतर आता निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये ३ तरुण मुलीची सत्य कहाणी असा बदल केलाय. द केरला स्टोरी च्या मेकर्सनी नमतं घेतलेलं दिसतंय.
काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी ३२००० मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचा मुद्दा उपस्थित करत पुरावे सादर करा अन् एक कोटी रुपये जिंका असं आव्हान दिले होते. आता त्यातच ३२ हजारांच्या आकड्याबाबत गदारोळ सुरू झाला असतांनाच हा बदल खुप महत्वपुर्ण असल्याच्या चर्चा रंगल्या आहे.
दरम्यान द केरला स्टोरी वर बंदी घालण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली असून चित्रपटाच्या बंदीचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं म्हटलं असून यात सुप्रीम कोर्ट कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असं म्हटलं आहे.
याशिवाय CBFC ने अभिनेत्री अदा शर्माच्या या चित्रपटात एक-दोन नव्हे तर १० कट केले आहेत आणि 'ए' प्रमाणपत्रासह चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली आहे. द केरला स्टोरी ५ मे ला रिलीज होतोय.