बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचे निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 d ago
शारदा सिन्हा
शारदा सिन्हा

 

बिहारच्या गानकोकीळा म्हणून ख्याती असलेल्या प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन झालं आहे. त्या ७२ वर्षांच्या होत्या. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाच्या आजारानं त्या ग्रस्त होत्या, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, अखेर मंगळवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

शारदा सिन्हा यांचा मुलगा अंशुमन सिन्हा यांनी शारदा सिन्हांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही निधनाची बातमी दिली. शारदा सिन्हा यांचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहीलं की, तुमच्या सर्वांची प्रार्थना आणि प्रेम कायम माझ्यासोबत राहील. आईला छठ मातेनं आपल्याकडं बोलावलं आहे. आई आता शाररिक रुपानं आपल्यामध्ये राहिली नाही.

शारदा सिन्हा यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, "सुप्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनामुळं मी अत्यंत दु:खी आहे. त्यांनी गायलेल्या मैथिली आणि भोजपुरी लोकगितं अनेक दशकांपासून लोकप्रिय होती. धार्मिकतेशी जोडलेल्या त्यांच्या छठ पुजेवरील अनेक सुमधुर गाण्यांची धुन कायम स्मरणात राहील. त्यांचं जाण्यानं संगीत जगताचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं या दुःखद प्रसंगी माझ्या शोकभावना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत.