आमिर खानचा होणार आंतरराष्ट्रीय सन्मान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 9 d ago
रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमिर खान होणार सन्मानीत
रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमिर खान होणार सन्मानीत

 

बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता आमिर खानला यंदाच्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (आरएसआयएफएफ) विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. हा प्रतिष्ठित महोत्सव ५ ते १४ डिसेंबरदरम्यान सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. यात ऑस्कर नामांकन मिळालेली अभिनेत्री एमिली ब्लंटलाही सन्मानित करण्यात येईल.
 
आमिर खान आणि एमिली ब्लंट यांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी तसेच चित्रपटसृष्टीवरील अमिट प्रभावासाठी हा सन्मान दिला जाणार आहे. फेस्टिव्हलमध्ये व्हायोला डेव्हिस आणि मोना झाकी यांसारखे अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. आमिर आणि एमिली ब्लंट 'इन कॉन्व्हर्सेशन विथ' या सत्रात सहभागी होणार असून अँड्र्यू गारफिल्ड, इवा लॉन्गोरिया, करिना कपूर खान आणि रणबीर कपूर यांसारख्या ताऱ्यांसोबत त्यांचे अनुभव आणि चित्रपटांविषयी चर्चा करतील. रेड सी फिल्म फेस्टिव्हलच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर आमिर खानबद्दल लिहिले गेले आहे की, 'आमिर खान यांनी भारतीय चित्रपटांना जागतिक ओळख देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अनोख्या कथा सांगण्याच्या शैलीला आणि अपार समर्पणाला सन्मानित करण्यात येणार आहे.'
 
आमिर खानने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लाल सिंग चड्डा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. तो 'सीतारे जमीन पर' या चित्रपटातून परतणार असून या चित्रपटात त्याच्यासोबत जेनेलिया डिसूझाही दिसणार आहे.