बॉलीवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने नेहमीच आपल्या भूमिकांमध्ये परिपूर्णता दाखवली आहे, मात्र त्याचा मुलगा जुनैद खान याच्या 'लवयापा' हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकण्यात अपयशी ठरला. या चित्रपटात जुनैदसोबत खुशी कपूर मुख्य भूमिकेत होती, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या अपयशावर आमिर खानने प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत आमिरने सांगितले, "चांगले झाले!" त्याने हे स्पष्ट केले की, प्रारंभीचा संघर्षच माणसाला खऱ्या अर्थाने घडवतो आणि यातून शिकण्यास मदत होते. तसेच त्याने मुलाच्या अभिनयाची प्रशंसा करत सांगितले की, "जुनैदला पात्र समजून घेण्याची चांगली समज आहे आणि त्याने 'महाराज' आणि 'लवयापा' मध्ये चांगले काम केले आहे, परंतु आमिरने जुनैदच्या काही उणिवाही स्वीकारल्या. त्याच्या डान्सिंगमध्ये सहजता नाही, जसे आमिरलाही सुरुवातीला वाटत होते. तसेच तो सोशल इंटरॅक्शन आणि मीडिया मुलाखतींसाठी अस्वस्थ वाटतो, ज्यावर त्याने सुधारणा करायला हवी."
आमिर खान आणि जुनैदमध्ये अनेक साम्य असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात आमिर म्हणाला, "मी देखील करिअरच्या सुरुवातीला लाजाळू होतो आणि माध्यमांसमोर बोलताना संकोच वाटायचा." तसेच दोघेही स्वतःच्या मनाने निर्णय घेतात, लोकांना ते पटो किंवा न पटो. आता जुनैद त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये कसा काम करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.