संगीतकार ए. आर. रेहमान
"संगीत क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराचे चांगले आणि वाईट असे परिणाम पाहायला मिळतील पण 'एआय'वर आपण आताच नियंत्रण ठेवले नाही तर त्यामुळे अभूतपूर्व अशी गोंधळाची स्थिती निर्माण होईल. कला क्षेत्रामध्ये 'एआय' हे ऑक्सिजनमध्ये विष मिसळण्यासारखे आहे," अशी भीती दोन ऑस्कर, एक गोल्डन ग्लोब आणि ग्रॅमी पुरस्कारांनी सन्मानित झालेले नामवंत संगीतकार ए. आर. रेहमान यांनी व्यक्त केली आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी 'एआय'चे कला क्षेत्रावर नेमके काय परिणाम होतील याबाबत विस्ताराने भाष्य केले.
रेहमान यांनी 'लाल सलाम' चित्रपटातील 'थिमिरी येलुदा' या गाण्यासाठी दिवंगत गायक बंबा बक्या आणि शाहीद हमीद यांचे आवाज 'एआय'च्या साहाय्याने पुन्हा जिवंत केले होते; मात्र हे करताना त्यांनी संबंधित गायकांच्या कुटुंबीयांची संमती घेतली होती. याउलट सध्या अनेक जण प्रसिद्ध गायकांच्या आवाजाचा वापर करून अमर्याद, अश्लील किंवा आक्षेपार्ह स्वरूपाची गाणी तयार करत असल्याचे त्यांनी नमूद केले. 'काही गाणी अपमानास्पद असतात आणि ती लोकप्रिय गायकांच्या आवाजात तयार केली जातात. जर हे रोखले नाही तर डिजिटल माध्यमात अराजकता पसरू शकते,' असे रेहमान यांनी स्पष्टपणे सांगितले. समाजात जसा आचारसंहितेचा नियम असतो, तसाच डिजिटल जगातही एक शिस्त असणे गरजचे आहे,' असेही ते म्हणाले.
वंडरमेंट टूरसाठी तयारी
सध्या रेहमान 'द वंडरमेंट टूर' या भव्य संगीत मैफिलीसाठी तयारी करत आहेत. ३ मे ला डी. वाय. पाटील स्टेडियम (मुंबई) येथे होणाऱ्या या मैफिलीत त्यांची गाजलेली गाणी सादर केली जाणार आहेत. याशिवाय रेहमान अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहेत. त्यात आनंद एल. राय यांचा 'तेरे इश्क में', मणिरत्नम यांचा 'ठग लाइफ', राजकुमार संतोषी यांचा 'लाहोर १९४७', मीना कुमारी यांच्यावर आधारित चरित्रपट व हंसल मेहता दिग्दर्शित 'गांधी' ही वेब मालिका यांचा समावेश आहे. 'गांधी' मालिकेबाबत बोलताना रहमान म्हणाले, 'गांधीजींचे आयुष्य म्हणजे एक आदर्श शालेय पाठ्यपुस्तक आहे, जे जुन्या आणि नव्या पिढीला सतत प्रेरणा देते.'