कार्यक्रमात उपस्थित डॉ. हमीद दाभोलकर, लेखिका हीना कौसर खान, रसिका आगाशे, जमीर कांबळे आणि गीताली वि. मं.
'मिळून साऱ्याजणी' मासिकाने आयोजित केलेल्या सावित्री-जोतिबा समता उत्सवात रसिका आगाशे यांनी 'ए बिस्मिल्लाह' एकपात्री प्रयोग सादर केला. या कार्यक्रमात 'मिळून साऱ्याजणी' आणि का. स. वाणी प्रतिष्ठान धुळे आयोजित 'रेऊ कथा स्पर्धा २०२४'चे पारितोषिक वितरण झाले. मुक्ता बाम, प्रसन्न दाभोलकर, गायत्री मुळे, अभिराम दीक्षित व श्रद्धा भट यांना पारितोषिक मिळाले. ज्येष्ठ लेखिका नीलिमा बोरवणकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. त्यानंतर झालेल्या चर्चासत्रात डॉ. हमीद दाभोलकर, लेखिका हीना कौसर खान, रसिका आगाशे आणि जमीर कांबळे यांच्याशी गीताली वि. मं. यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना डॉ. दाभोलकर म्हणाले, "चळवळीमध्ये काम करताना ज्याला आपण विरोध करत आहोत, त्याच्यासारखेच आपण होत नाही ना, हे तपासले पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांचे समज हे मूलतत्त्ववादी विचारांप्रमाणे असतात का? याचाही विचार झाला पाहिजे." खान म्हणाल्या, "धर्मात सुधारणा होईल, तेव्हा मुस्लिम महिला मुक्त होईल, हा निव्वळ गैरसमज आहे." कांबळे म्हणाले, "मी शोषितेच्या भूमिकेत राहणार नाही, असा निश्चय महिलेने केला पाहिजे." या वेळी वक्त्यांनी स्त्रिया आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी व्यासपीठ उभारण्याची गरज असल्याची भूमिका मांडली.