समाजातील तरूणांचा स्पर्धापरीक्षांकडे कल वाढत आहे. अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजातील तरुण-तरुणी देखील स्पर्धापरीक्षा देत आहेत. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शन मिळवण्यापासून वंचित राहत आहेत. यामुळे सोलापुरातील तरुणांच्या भविष्याला दिशा देण्यासाठी वाचनालय अन् मार्गदर्शन केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे. वाचनालय अन् मार्गदर्शन केंद्र मिळण्यासाठी शहरातील तरुणवर्गदेखील मोठी मागणी करत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात उर्दू माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच अन्य माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी देखील नाही. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून विद्यार्थी त्यांचे करिअर घडवू शकतात. मात्र केवळ मार्गदर्शनाअभावी तरुण ही करिअरची संधी गमावत आहेत.
सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी उर्दूतून पुरेशी पुस्तके उपलब्ध नाहीत. तसेच अन्य माध्यमातील पुस्तके उपलब्ध नाहीत. उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना पर्यायी माध्यमाचे नियोजन करून देण्याची गरज असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षा वाचनालय शहरात उभारणे गरजेचे आहे.
आज काही संस्था थोडेफार वाचन चळवळीसाठी मदत करत असतात. पण ते प्रयत्न अपुरे पडतात. या वाचनालयात सातत्याने चालू घडामोडी विषयक मासिकांचीदेखील गरज असते. उर्दू माध्यमात या विषयावरील नियतकालिके कमी असली तरी मराठी, इंग्रजी व हिंदी माध्यमातील उपलब्ध करायला हवीत. या शिवाय शिक्षण संस्थांमधून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देखील केले जात नाही. त्यासाठी अन्य माध्यमातील मार्गदर्शक भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
महिलांसाठी हवे स्वतंत्र वाचनालय
शहरात महिलांसाठी एक स्वतंत्र वाचनालय असण्याची गरज आहे. या वाचनालयात स्पर्धा परीक्षा पुस्तकासोबत अन्य भाषांतील साहित्यदेखील उपलब्ध करायला हवे. या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी हे वाचनालय महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते. तसेच त्या स्पर्धा परीक्षा देण्यास पात्र ठरतील.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रतिक्रिया
वाचनालयाच्या आवश्यकतेविषयी बोलताना सोलापुरातील भाषा संशोधक व अनुवादक सय्यद वायेज म्हणतात, “स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा आणि मार्गदर्शन तरुण, तरुणींसाठी अत्यंत गरजेचे आहे. सोलापूर शहरात एका मोठ्या वाचनालयाची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांना उर्दू माध्यमासह इतर काही माध्यमांच्या साहित्याची गरज आहे.”
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे अर्सलान शेख याविषयी बोलताना म्हणतात, “स्पर्धा परीक्षांसाठी जनजागृती प्रत्येक शिक्षण संस्थेत करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठीचे नियोजन, टप्पे आणि अभ्यास कसा करावा यावर मार्गदर्शन करण्याची गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी काही टेलिग्राम चॅनेल तसेच सोलापूरचे आयएएस अधिकारी शुभम भैसारे यांचे मार्गदर्शन लाभते.”
स्पर्धा परीक्षेची तयार करत असताना विद्यार्थ्यांना कुटुंबाचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. अभ्यासाच्या व्यापामुळे इतर काही कारणांमुळे विद्यार्थी तणावातून जातात. याविषयी बोलताना स्पर्धा परीक्षा अभ्यासक गजाली नाज अर्सलन शेख म्हणतात, “सुरुवातीला महाविद्यालयीन जीवनातच स्पर्धा परीक्षेचे ध्येय ठरवायला हवे. ध्येयनिश्चितीसाठी पालकांनी विद्यार्थ्यांना थोडासा अवधी देऊन दिशा ठरवण्यासाठी मदत करावी. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे विद्यार्थी तणावातून जाऊ शकत नाही. त्यामुळे कमी वेळात जास्त अभ्यास होतो.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter