पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये सध्या गणले जातात. जगभरातील अनेक देशांकडून मोदींचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानही केला आहे. तर अनेकजण त्यांना आपला आदर्शही मानतात. याच पार्श्वभूमीवर वारणासीतील नजमा परवीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'पीएचडी' केली आहे.
पंतप्रधान मोदींवर पीएचडी करणाऱ्या नजमा परवीन या भारतामधील पहिल्या मुस्लीम महिला ठरल्या आहेत. नजमा परवीन या पंतप्रधान मोदींचं राजकीय आयुष्य आणि त्यांच्या संघर्षाच्या काळाशी चांगल्याच प्रभावीत झाल्या आहेत.
एका वृत्तावाहिनीशी बोलताना नजमा परवीन यांनी सांगितले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील माझा संशोधन अभ्यास २०१४मध्ये सुरू केला होता. राज्यशास्त्र विषायांतर्गत माझा विषय 'नरेंद्र मोदींचे राजकीय नेतृत्व - एक विश्लेषणात्मक अध्ययन' (२०१४ लोकसभा निवडणुकीच्या विशेष संदर्भासह) हा होता. जो २०१४मध्ये सुरू होऊन १ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाला. हे संशोधन वाराणसी हिंदू विद्यापीठातील प्राचार्य संजय श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
यामध्ये प्रामुख्याने पाच प्रकरणे आहेत, या अध्यायांमध्ये काँग्रेसची सत्ता आणि घराणेशाहीपासून मुक्तता, पंतप्रधान मोदींचे राजकीय जीवन, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे कार्य, विरोधकांकडून आरोप आणि टीकेचा कालावधी, जनता आणि माध्यमांचा पाठींबा याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुडलेले असल्याने पंतप्रधान मोदींकडे बघण्याचा मुस्लीम समाजाचा दृष्टिकोन यांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदींवरील विषयाची निवड का केली?
पंतप्रधान मोदींचे संपूर्ण जीवन मला अतिशय प्रभावित करणारे वाटले. याशिवाय ते मागील ७० ते ७५ वर्षांमधील एक असे राजकीय नेते वाटले, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित केले आहे. त्यांच्यावर अनेक आरोप झाले, एका विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचाही आऱोप करण्यात आला. मात्र त्यांनी मुख्यमंत्री असताना कुठलाही भेदभाव न करता, सर्व जाती-धर्मांच्या लोकांचा विकास केला आणि याच काळात आव्हानांचा सामान करत ते भारताचे पंतप्रधान पदाचे उमेदवारही बनले. असे नजमा परवीन यांनी सांगितले.
मला याने काहीच फरक पडत नाही की...
विरोधकांची तुमच्यावर टीकाही होऊ शकते, असे जेव्हा नजमा परवीन यांना म्हटले गेले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, राज्यशास्त्र विषय असल्याने मला एका राजकीय नेत्याची संशोधन अभ्यासासाठी निवड करायची होती आणि त्यामुळे मी पंतप्रधान मोदींची निवड केली. मला याने काहीच फरक पडत नाही की, यामुळे माझ्यावर टीका होईल किंवा मी एखाद्या राजकीय पक्षाच्या निशाण्यावर येईल. पंतप्रधान मोदी आपल्यासाठी आदर्श आहेत आणि मी मानते की येणाऱ्या काळात त्यांच्या नेतृत्वात भारत प्रत्येक क्षेत्रात नवीन शिखरांवर असेल.