ZPच्या उर्दू शाळेने विज्ञान प्रदर्शनात पटकावला प्रथम क्रमांक

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 3 Months ago
विज्ञान प्रदर्शनातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना अफ्फान बलुलखान, आरिफ नदाफ व शिक्षिका तरनुमजहां शेख
विज्ञान प्रदर्शनातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना अफ्फान बलुलखान, आरिफ नदाफ व शिक्षिका तरनुमजहां शेख

 

रोजच आयुष्य जगताना आपल्याला सर्वाधिक गरज पडते ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची. भारतीय संविधानाने देखील घटनेच्या 51 (A) कलमामध्ये भारतीयांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे,  एवढं या गोष्टीचे महत्त्व आहे.

मुस्लिम समाजातही हे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढले पाहिजे यासाठी राज्यातील अनेक उर्दू शाळेत विज्ञानाचा धडे दिले जातात. विशेष म्हणजे विद्यार्थीदेखील आवडीने विज्ञानकडे वळत आहेत. यामुळे मुस्लिम विद्यार्थी भौतिक जीवनात विज्ञानाच्या जोडीने प्रगती करत आहेत.

नुकतेच दक्षिण सोलापूर शिक्षण विभागातर्फे ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुक्यासह जिल्ह्यातील आणि बाहेरील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये काही उर्दू शाळांचादेखील समावेश होता. यातीलच एक म्हणजे होटगी स्टेशन येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा. या शाळेने या प्रदर्शनात पहिला क्रमांक पटकावला आहे.

इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अफ्फान मुनीव बलुलखान व आरिफ दावल नदाफ यांनी सादर केलेला 'प्रोजेक्ट वायू प्रदूषण कंट्रोल युनिट' हा प्रयोग प्रदर्शनात मांडला होता. त्यांच्या या प्रयोगास  तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांच्या वर्गशिक्षिका तरन्नुमजहां फकरुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही विद्यार्थ्यांनी उपस्थितांसामोर उत्कृष्ट सादरीकरण केले.

यावेळी गट शिक्षणाधिकारी जयश्री सुतार यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले. या यशाबद्दल मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

विज्ञानाचे आपल्या जीवनातील महत्व जाणून घेण्यासाठी आवाज मराठीने काही मान्यवरांशी संवाद साधला. विज्ञानाचे आणि प्रदर्शनाचे महत्व सांगताना प्रा. संदेश पाटील म्हणतात, “आपल्या भोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर आपलं बारकाईने लक्ष असणे गरजेचे आहे. आजचे जग हे विज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे आहे. या जगात टिकायचे असेल तर आपल्या सर्वांना   वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून काम केले पाहिजे. हा वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्यासाठी, समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी विज्ञान प्रदर्शने महत्वाची भूमिका बजावतात.”

- (प्रकाश सनपूरकर, फजल पठाण )