संमेलनाच्या आयोजनासाठी चोख तयारी, भोजन- निवास व्यवस्थेचे उत्तम पर्याय आणि मराठीच्या अभिजात दर्जासाठी वाढवता येणारा दबाव, आदी कारणांमुळे आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ म्हणून दिल्लीला पसंती देण्यात आली. राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई आणि पुरेशा तयारीअभावी इचलकरंजी, ही दोन स्थळे आयोजनाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक गेल्या रविवारी (ता. ४) मुंबईत झाली. महामंडळाकडे यंदाच्या संमेलनासाठी एकूण सात स्थळांचे पर्याय आले होते. त्यातील इचलकंरजी, मुंबई आणि दिल्ली या तीन ठिकाणी महामंडळाच्या स्थळ निवड समितीने भेट देऊन पाहणी केली. या समितीने दिलेल्या अहवालावर चर्चा करून महामंडळाच्या बैठकीत दिल्लीची निवड करण्यात आली.
लहान गावांत होणारी गैरसोय, ग्रंथविक्रीला मिळणारा अल्प प्रतिसाद, अशी काही कारणे पाहता पर्याय म्हणून यापुढील संमेलने जिल्हास्तरावरच भरवण्याची चर्चा गेल्या वर्षी महामंडळाच्या बैठकीत झाली होती. त्यातच मुंबई साहित्य संघाकडे महामंडळ असताना दोन्ही संमेलने ग्रामीण आणि निमशहरी भागातच झाली होती. त्यामुळे यंदा इचलकरंजीला पसंती मिळण्याची शक्यता कमी होती. त्यातच इचलकरंजीला स्थळ निवड समिती पाहणी करायला गेली असता आयोजनासाठी पुरेशी व्यवस्था असल्याचे जाणवले नाही. त्यामुळे इचलकरंजीच्या नावावर फुली पडली. मुंबईतील वांद्रे नॅशनल लायब्ररीने संमेलनासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र स्थळ निवड समितीला मुंबई विद्यापीठाची जागा दाखवण्यात आली. पाहणीवेळी मुंबईतील एक नेते उपस्थित होते. 'संमेलनासाठी चोख व्यवस्था करू, पण संमेलनाध्यक्ष आम्ही सांगू तोच असेल', असा थेट दबाव त्यांनी टाकला. महामंडळातील अनेक सदस्यांनी या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मुंबईचा प्रस्तावही बाद झाला. दिल्लीचे निमंत्रण दिलेल्या सरहद संस्थेची तयारी मात्र चोख होती, निवास, ग्रंथ प्रदर्शन आदींसाठी उत्तम व्यवस्था त्यांच्याकडे उपलब्ध होती. त्यामुळे संमेलनासाठी हेच स्थळ अंतिम करण्यात आले.
ठिकाण : तालकटोरा इनडोअर स्टेडियम ?
दिल्लीत हिवाळा आणि उन्हाळा, हे दोन्ही ऋतू कडाक्याचे असतात. त्याचा सुवर्णमध्य गाठून फेब्रुवारी-मार्च महिन्यांमध्ये संमेलनाच्या तारखा निश्चित कराव्या लागणार आहेत. निवडणुका, परीक्षा आणि संसदेचे अधिवेशन या बाबी लक्षात घेऊन फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात संमेलन होण्याची शक्यता आहे. आयोजक संस्था आणि साहित्य महामंडळातील चर्चेनंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच, संमेलनासाठी तालकटोरा इनडोअर स्टेडियम हे ठिकाण अंतिम होण्याची दाट शक्यता आहे.
नेत्यांची भाऊगर्दी टाळण्याचे आव्हान
दिल्लीत संमेलन होत असताना मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी वाढवता येणारा दबाव, ही एक जमेची बाजू आहे. दिल्लीतील मराठी नागरिक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यातून संमेलनासाठी आवश्यक असणारी गर्दी होऊ शकते. दिल्लीत संमेलन होत असल्यामुळे ते यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते सहकार्य करण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी व्यासपीठावरील राजकीय नेत्यांची भाऊगर्दी टाळण्याचे आव्हान महामंडळ आणि आयोजकांसमोर असेल.