मुंबईतील कॉलेजमधील एका हिजाब आणि बुरखा बंदीचा प्रश्न सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. या कॉलेजमधील हिजाब आणि बुरखा बंदी विरोधात असणाऱ्या विद्यार्थिनींनी सुप्रीम कोर्टात पोहोचल्या आहेत. या विद्यार्थिनींनी कॉलेजच्या नियमाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
मुंबईतील आचार्य कॉलेज आणि मराठे कॉलेज प्रशासनाने हिजाब, बुरखा आणि टोपी घालण्यावर बंदी घातली आहे. याविरोधात ९ मुलींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे. या नियमावर सुप्रीम कोर्ट काय भाष्य करतं, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईच्या एनजी आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना बुरखा, हिजाब घालण्यास बंदी घातली होती. कॉलेजने बंदी घातल्यानंतर या कॉलेजमधील ९ विद्यार्थिनींनी धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकाराचा उल्लंघन होत असल्याचा दावा केला होता.
विद्यार्थिनींना या ड्रेस कोडच्या आडून घेतलेला हिजाब आणि बुरखा बंदीचा नियम मागे घ्यावा, अशी विनंती प्रशासनला केली होती. मात्र, प्रशासनाने नियम कायम ठेवला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. या विद्यार्थिनींनी कोर्टातील याचिकेत कॉलेजमधील हिजाब आणि बुरख्यावरील बंदी हटवण्याची मागणी केली.
दरम्यान, कॉलेजने त्यांच्या वेबसाइटवरच विद्यार्थ्यांसाठी बुरखा आणि हिजाब बंदीच्या नियमाविषयी सूचना केल्या. या कॉलेज प्रशासनाने व्हॉट्सअॅपवरही सूचना दिली होती. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायाधीशांनी कॉलेज प्रशासनाचा नियम कायम ठेवला. मुंबई उच्च न्यायालयातील हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे.