शांतता पुणेकर झोपले आहे. हे वाक्य तर अनेकदा मिम्समध्ये सगळ्यांनीच वाचले असेल. मात्र सध्या ‘शांतता पुणेकर वाचत आहेत!’ हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल होतोय, कारण पुण्यात १४ डिसेंबरपासून ते २२ डिसेंबरपर्यन्त पुस्तक महोत्सव जोरदार सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांच्यावतीने या फेस्टिव्हलचे आयोजन पुण्याच्या ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेजमध्ये करण्यात आले आहे.
पुण्याला ‘ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट’ असं म्हणतात. ब्रिटीश राजवटीच्या आधीपासून विद्येचे माहेरघर, ज्ञानाचे मूळ गाव, अशी पुण्याची ओळख आहे; मात्र दिल्लीच्या प्रगती मैदानावर होणाऱ्या जागतिक पुस्तक महोत्सवाची उणीव पुण्यामध्ये जाणवत होती. ‘पुणे तिथे काय उणे’ या पुण्याच्या पारंपरिक ओळखीला जपत पुण्याने ही उणीव ही भरून काढली आहे. २०२३ पासून पुण्यात ‘पुणे पुस्तक महोत्सवा’ची सुरुवात झाली. त्यासोबत तरुणाई पुस्तकांपासून दूर चाललीय या सर्रास वापरल्या जाणाऱ्या वाक्यालाही पुण्याच्या तरुणाईने मोडीत काढल आहे. यंदाच्या पुस्तक महोत्सवात गेल्या वर्षीचा प्रतिसाद पाहून अनेक नवीन गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यातील महत्वाची गोष्ट होती उर्दू भाषेतील विविध बूक स्टॉल्स .
पुणे महाराष्ट्राचे बहुसांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. तसेच पुण्याचे वाचक ही बहुभाषिक आहे. पुण्यात इंग्रजी, मराठी आणि हिंदी साहित्याची सर्व प्रकारची पुस्तके अगदी सहज उपलब्ध होतात परंतु उर्दू साहित्य वाचण्यासाठी वाचकांना मोठी धडपड करावी लागते. यंदाच्या पुस्तक महोत्सवात उर्दू साहित्याबाबत वाचकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या लेखात उर्दू साहित्याच्या काही बुक्स स्टॉल्सबद्दलची माहिती आपण घेणार आहोत…
IQRA बुक स्टॉल
IQRA इंटरनॅशनल एज्युकेशनल फाऊंडेशन ही १९९३ मध्ये स्थापन करण्यात आलेली प्रकाशन कंपनी आहे. उत्तर अमेरिकेतील ही संस्था आहे. मुंबई तसेच दिल्लीमध्ये त्यांच्या संस्था आहेत. यावर्षी त्यांनी पुण्याच्या पुस्तक महोत्सवात हजेरी लावली आहे. दिल्ली पुस्तक प्रदर्शनात महाराष्ट्रीयन वाचकांचा प्रतिसाद पाहून यंदा त्यांनी पुण्यातही सहभाग नोंदवला आहे.
रफत काजमी यांनी IQRA इंटरनॅशनल एज्युकेशनल फाऊंडेशनच्या नावाबद्दल खुलासा करताना सांगितले की, “IQRA ही इस्लाम मधील सर्वात पौराणिक आणि पहिली आयात आहे, जिचा अर्थ Read (वाचा ) असा होतो. इस्लाममध्ये वाचनाला फार महत्व आहे. म्हणून आम्ही आमच्या फाऊंडेशनचे नाव IQRA असे ठेवले आहे.” पुढे काजमी म्हणतात, “समाजातील महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारी, विषमता या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर वाचन हे महत्वाच आहे, असे इस्लाममध्ये सांगितले आहे.त्यामुळे वाचनाची आवड मुलांना लहान वयातच लागावी व त्यांचे योग्य संगोपन व्हावे हाच आमचा हेतू आहे.”
रफत काजमी यांनी पुस्तकांबद्दल माहिती देताना सांगितले की, “मुलांना योग्य इस्लामिक शिक्षण मिळाव. तसेच ते त्यांच्या मातृभाषेतून मिळाव म्हणून उर्दू, हिन्दी आणि इंग्रजी या भाषेत लहान मुलांसाठी ही पुस्तके आम्ही प्रकाशित करत आहोत”.
इस्लामबद्दलचे अचूक ज्ञान लहानपणीपासूनच मुलांना मिळावे त्याचबरोबर भारताचा जबाबदार नागरिक घडावा म्हणून या फाऊंडेशनची स्थापना केल्याची माहिती त्यांनी आवाज मराठीला दिली. इतर लोकांनाही इस्लाम समजून घ्यायचा असेल तर हिन्दी आणि इंग्रजीमध्ये सोप्या शब्दात भाषांतरित केलेली पुस्तके इथे उपलब्ध आहेत. प्रामुख्याने धार्मिक साहित्य या स्टॉलवर वाचकांना उपलब्ध होणार आहे.
YUSUFI बुक स्टॉल
युसिफी पब्लिकेशनविषयी बोलताना मुहम्मद रेयान म्हणतात, “युसिफी पब्लिकेशन उर्दू साहित्याचे भंडार आहे. आमच्याकडे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींमध्ये वाचली जाणारी पुस्तके, ग्रंथ हे उर्दू भाषेत आहे. ही सर्व पुस्तके इस्लाम, अध्यात्माशी संबंधित आहेत. यामध्ये कुराणमधील आणि पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील काही निवडक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.”
पुढे ते म्हणतात, “या पुस्तकांमधून आम्हाला इस्लाम, पैगंबर मोहम्मद यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचवायचे आहे. आमचा वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहेत. परंतु काही मराठी बांधवदेखील उर्दू साहित्यामध्ये रूची दाखवत आहे. सध्या महाराष्ट्रात आणि देशात उर्दू भाषेबद्दल कुतूहल निर्माण होत आहे. लोक उर्दू भाषा जाणून घेण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.”
पुणे पुस्तक मोहोत्सवाबद्दल बोलताना मुहम्मद रेयान म्हणतात, “आम्ही फक्त दिल्लीमध्ये असे मोठे पुस्तक प्रदर्शन पहिले होते. परंतु पुण्यात सुरू झालेले हे पुस्तक प्रदर्शन नेत्रदीपक आहे. याठिकाणी लाखो पुस्तके आणि त्या पुस्तकांवर प्रेम करणारा वाचक आहे. बाकी ठिकाणी उर्दू साहित्य मिळवण्यासाठी वाचकांना मेहनत घ्यावी लागते. परंतु दिल्ली पुण्यासारख्या या पुस्तक प्रदर्शनांमुळे उर्दू साहित्य वाचकांना सहज उपलब्ध होत आहे.”
राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद
भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे भाषिक वैविध्य जपले जावे म्हणून भारत सरकारकडून विविध भाषेतील पुस्तके प्रदर्शित केली जातात. राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद कडूनही या पुस्तक महोत्सवात सहभाग नोंदवला आहे. लहानमुलांपासून तरुणाईला मोहात पाडतील असेही उर्दू साहित्यातील पुस्तके इथे उपलब्ध आहेत. विविध कादंबऱ्या, शैक्षणिक पुस्तके, कथा, कविता, मनोरंजनात्मक साहित्य अशा विविध स्वरुपाची पुस्तके इथे उपलब्ध आहेत.
साहित्य हे नेहमीच मनाला रुंजी घालत असते. याला उर्दू साहित्यही अपवाद नाही. सध्या तरुणाईमध्येही विविध संगीत आणि साहित्यिक कार्यक्रमांमुळे उर्दूबद्दल आकर्षण वाढत आहे. महाराष्ट्रातूनही याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. पुणे पुस्तक महोत्सवातील उर्दू बुक स्टॉलला मिळणारा प्रतिसाद याचा पुरावा आहे. त्यासोबतच साहित्य हे कोणत्याही विशिष्ट धर्माचे किंवा वर्गाचे मोहताज नसते. हे यंदाच्या पुस्तक महोत्सवाने सिद्ध केले आहे. उर्दूभाषेबद्दल वाढता प्रतिसाद भारतीय भाषिक वैविध्य टिकवण्यासाठी एक महत्वाची सुरुवात आहे.