समीर दि शेख
पुण्याच्या ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरू असलेला पुणे बुक फेस्टिवल प्रचंड गर्दी खेचतोय. यावर्षी १४ ते २२ डिसेंबर या काळात केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांच्यावतीने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील महत्त्वाच्या प्रकाशकांच्या पुस्तकांनी या फेस्टिव्हलचा भव्यदिव्य मंडप सजलाय.
खरे पाहता पुणे बुक फेस्टिव्हल या उपक्रमाचे हे अवघे दुसरे वर्ष आहे. पण उत्तम आयोजन आणि मुबलक प्रसिद्धीमुळे हा फेस्टिव्हल अल्पावधीतच लोकप्रिय झालाय. दररोज सकाळी १० पासून रात्री १० पर्यंत इथे असणारी तुडुंब गर्दी या उपक्रमाच्या लोकप्रियतेची साक्ष द्यायला पुरेशी आहे.
शिक्षणाचे माहेरघर, ऑक्सफर्ड ऑफ दि ईस्ट, महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र अशी एक से बढकर एक बिरुदावली मिरवणाऱ्या पुण्यात हौशी मंडळी आणि संस्था पुस्तक प्रदर्शन आयोजित करायचे. मात्र पुण्याच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वैभवाला न्याय देईल असे भव्य पुस्तक प्रदर्शन यापूर्वी आयोजित झाले नव्हते. त्यामुळे सर्वच वर्गातील वाचक अशा भव्यदिव्य पुस्तक प्रदर्शनाला आसुसलेले होते, आणि आयोजनाचा दिल्लीत जगप्रसिद्ध वर्ल्ड बुक फेयरशी नाते सांगणारा पुणे बुक फेस्टिव्हल सुरू व्हायचा अवकाश... सर्वांनी अक्षरशः फर्ग्युसनकडे धाव तर घेतलीच पण जबरदस्त पुस्तक खरेदीही झाली.
गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही साहित्य रसिकांची आणि पुस्तकप्रेमींची या फेस्टिव्हलमधील पुस्तकांच्या स्टॉल्सवर झुंबड पाहायला मिळते आहे. सर्व वयोगटातील वाचक अगदी कडाक्याच्या थंडीलाही न जुमानता तासनतास पुस्तक चाळताना आणि खरेदी करताना दिसताहेत. साहित्यापासून विज्ञानापर्यंत आणि अध्यात्मापासून तंत्रज्ञानापर्यंत जवळपास सर्वच विषयांवरील पुस्तके इथे उपलब्ध आहे. एकीकडे जगभरातील पुस्तके घरपोच पुरवणारी अमेझॉनसारखी सोय उपलब्ध असताना, आणि दुसरीकडे किंडल सारखी आयुधं हाती असताना तरुणाईची पावले बुक फेस्टिव्हलकडे वळतील का अशी शंका उपस्थित करण्यांनी पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये सहज चक्कर जरी मारली तरी त्यांना सर्वत्र दिसेल ती उत्सुकतेने पुस्तके चाळणारे तरुण-तरुणी.
महाराष्ट्रातील अगदी आडबाजूच्या प्रकाशकांच्या स्टॉल्ससोबतच इथे हिंदी, इंग्रजी आणि उर्दूतील प्रकाशकांचेही स्टॉल्स गजबजून गेले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी हिंदी-उर्दू पुस्तकांचा मोठा वाचकवर्ग असूनही दुकानातून पुस्तक खरेदीचा कोणताही पर्याय त्यांना उपलब्ध नव्हता. आधीच रोडवलेल्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये क्वचित इंग्रजी पुस्तके मिळतात. हिंदी उर्दू पुस्तके तर पाहायलाही मिळत नाहीत. विक्रीतर दूरच. अशा सर्व वाचकांना पुणे बुक फेस्टिव्हलने ही संधी उपलब्ध करून दिली. त्यामूळे राजकमलपासून ते कामगारपर्यंत आणि राधा सोआमी सत्संग बिस पासून अंजुमने तरक्की ए उर्दू पर्यंत अनेक लोकप्रिय आणि काही दुर्मिळ प्रकाशकांचे स्टॉल्स इथे प्रचंड गर्दी खेचत आहेत. यापैकी काहींनी स्टॉकही संपत आल्याचे सांगितले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
आयडिया ऑफ इंडियाचे प्रतिबिंब
सर्व धर्मांना, संस्कृतीला आणि विचारधारांना खुल्या मनाने स्वीकारणाऱ्या आणि आपलेसे करून घेणाऱ्या भारतीय संस्कृतीचे, आयडिया ऑफ इंडियाचे प्रतिबिंबच जणू पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळतेय. इथे एकीकडे 'भारतीय विचार साधने'चाही स्टॉल आहे तर दुसरीकडे कामगार प्रकाशन आणि जनचेतनाच्या स्टॉलवरही तरुणाई गर्दी करते आहे. इथे हिंदू धर्म आणि संस्कृतीची माहिती देणारे अनेक स्टॉल्स आहेत तसे इस्लामविषयक पुस्तकांचे स्टॉल्सही केवळ दिमाखात उभे आहेत असे नव्हे तर वाचकही त्यांच्या स्टॉलवर जाऊन पुस्तके विकत घेताहेत, चर्चा करत आहे. राधा सोआमी सत्संग बिस सारख्या ना नफा ना तोटा तत्त्वावर सर्व धर्मीय संतांची पुस्तके अगदी अल्प दरात प्रकाशित करणाऱ्या संस्थेच्या स्टॉलवर गेलेल्या वाचकाला हिंदूसोबत बुद्ध, इस्लाम, ज्यू आणि पारसी संतांचीही माहिती मिळतेय मग तो आपसूकच गीतेसोबत रुमी आणि बुल्लेशाहसारख्या सूफीची पुस्तकेही खरेदी करतोय.
केवळ एका वर्षातच पुणे बुक फेस्टिव्हल स्वतःचे कल्ट तयार केले आहे. अक्षरशः गल्लीपासून शब्दशः दिल्लीपर्यंत या उत्सवावर भरभरून लिहिले जात आहे. हिंदीतील अनेक महत्त्वाचे साहित्यिक सोशल मीडियावर याविषयी भरभरून लिहीत आहेत आणि प्रचंड प्रतिसादाचे कौतुक करताहेत. तर दुसरीकडे, वाचनापासून दूर गेलीये असा जुन्या पिढीचा आरोप सहन करणारी पिढी सोशल मीडियावर पुणे बुक फेस्टिव्हलला दिलेल्या भेटीविषयी आणि खरेदी केलेल्या पुस्तकांविषयी रिल्स आणि vlogs करतीये.
पुणे बुक फेस्टिव्हलने पुस्तक विक्रेत्यांना, वाचकांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, वाचनसंस्कृतीची मुळे आणखी घट्ट केली आहे. मात्र या उत्सवाचे खरे यश म्हणजे या उपक्रमाने भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेच्या पुसट होत चाललेल्या सौंदर्याला नवसंजीवनी दिली आहे.
- समीर दि शेख