पुणे पुस्तक महोत्सवात उर्दू साहित्याला चालना

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 3 Months ago
पुणे पुस्तक महोत्सवातील नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेजचे दालन
पुणे पुस्तक महोत्सवातील नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेजचे दालन

 

वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) गेल्या वर्षीपासून पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ डिसेंबरला सुरु झालेला हा सोहळा उद्या २२ डिसेंबरला संपन्न होत आहे. 

भारतीय भाषांमधील पुस्तकांची तब्बल सहाशेंहून अधिक दालने, ८० पेक्षा अधिक पुस्तकांचा प्रकाशन सोहळा, लिट फेस्टिव्हलसह बाल चित्रपट महोत्सव, शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी यंदा पाहायला मिळाली. पुण्यासह महाराष्ट्र काय तर देशभरातून लोक या मोहोत्सावाला हजेरी लावण्यासाठी येत आहेत. 

या महोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरले ते लाखो वाचकांच्या मनात रुंजी असणारे उर्दू साहित्य. ‘उर्दू भाषा म्हणजे फक्त मुस्लिमांची, ते आपले नव्हे…’ हा बाळबोध सोडत वाचकवर्ग उर्दू साहित्याप्रती रुची दाखवत आहे. पुणे पुस्तक महोत्सवात देखील उर्दू साहित्याच्या दालनांमध्ये हे चित्र पाहायला मिळाले.  

नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेजचे आकर्षक दालन 
नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज दिल्ली यांच्यातर्फे पुणे पुस्तक महोत्सवात विशेष दालन लावले गेले आहे. या दालनात उर्दू भाषेतील शिक्षण, उर्दू साहित्य, बालसाहित्य, इस्लाम इतिहास, तसेच उर्दू शिकण्याची आवड असणाऱ्यांसाठी अतिशय मुबलक दरात पुस्तके उपलब्ध आहेत. 

या दालनाविषयी माहिती देताना अबुल शर्मा म्हणाले, “उर्दू भाषेबद्दलचा इतिहास, त्याबद्दलची व्यापकता लोकांना समजावी यासाठी सरकार वेगवेगळ्या शहरांमध्ये उपक्रम घेत असतात. या उपक्रमांमध्ये आमचा सक्रीय सहभाग असतो. उर्दू शाळा आणि कॉलेजांमध्ये देखील भाषेविषयी जागृतीचे कार्यक्रम घेतले जातात. परिषदांतर्फे याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते.”   

महाराष्ट्रातील मराठी रसिकाला गजलच्या वृत्ताच्या प्रेमातून उर्दू भाषेची थोडी गोडी लागतेय. उर्दू मुशायरांच्या कार्यक्रमाचे क्रेझ तरुणाईमध्ये वाढू लागले आहे. मग मराठी वाचक उर्दू साहित्याला कसा प्रतिसाद देतोय याविषयी विचारले असता अबुल सांगतात, “उर्दू ही हिंदी भाषेसारखी असल्याने त्याकडे तरुणाई आकर्षित होतेय. उर्दूची हिंदी आणि इंग्रजीत भाषांतरित केलेली पुस्तके सहज उपलब्ध होत असल्याने वाचकांना सहज वाचता येत आहेत. त्यामुळे उर्दूतील शायरी, कविता आणि कथांची पुस्तके याकडे अनेकांची रुची वाढतेय.”

ते पुढे म्हणतात, “या दालनाला भेट देणारा दुसरा वर्ग येतो तो साहित्यिक, अभ्यासक आणि इतिहासकारांचा आहे. इस्लामचा इतिहास, इस्लामिक संस्कृती, त्यावेळचे अर्थकारण याबद्दलची पुस्तके घेण्यासाठी अनेक लोकं इथे येत आहेत. उर्दूभाषेबद्दलची लोकांच्या मनातील उत्सुकता आणि त्याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी त्यांची धडपड पाहून आम्हाला आनंद होत आहे.”

उर्दू साहित्याचे हे दालन सर्व वयोगटातील लोकांसाठी समृद्ध आहे. याविषयी ते सांगतात, “याठिकाणी आम्ही उर्दू साहित्यातील पुस्तकांचे विविध विभाग केलेले आहेत. विशेष म्हणजे इथे मांडलेल्या प्रत्येक पुस्तकाचा लेखक हा भारतीय आहे. त्यामुळे भारतातील इस्लामिक संस्कृती, येथील राजकारणातील मुस्लीम नेते, भारतातील इस्लामिक खाद्यसंस्कृती याबद्दलचा परिपूर्ण इतिहास पुस्तकांमध्ये नोंदवलेला आहे.”

पुण्यातील या पुस्तक महोत्सवात उर्दूसह १५ भारतीय भाषांतील पुस्तकांची सहाशेहून अधिक दालने आहेत. पुस्तक प्रदर्शनाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणारे आणि वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम याठिकाणी झाले आहेत. वाचन-संस्कृती निर्माण होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत असले तरी, समाजात व्यक्तिगत पातळीवर या संदर्भातील घडामोडी जितक्या अधिक घडतील, तेवढी वाचनसंस्कृतीला चालना मिळेल.