देशभरातील ८२ शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 10 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

शिक्षकदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ५ सप्टेंबर२०२४ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ८२ निवडक पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ प्रदान करतील. भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर  रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील शिक्षकांच्या असामान्य योगदानाचा गौरव करणे आणि ज्यांनी आपली वचनबद्धता  आणि समर्पणाने केवळ विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही, तर त्यांचे जीवनही समृद्ध केले आहे, अशा शिक्षकांचा सन्मान करणे, हे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, रोख रु. ५०,००० आणि रौप्य पदक, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार विजेत्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधीही मिळेल.

पुरस्कारार्थींमध्ये जम्मू काश्मीरच्या डॉ. उर्फाना आमीन आणि उत्तर प्रदेशचे प्राध्यापक शाहनाझ अयुब यांचा समावेश आहे.  महाराष्ट्रातील मंतैय्या चिन्नी बेडके आणि सागर चित्तरंजन बगाडे या शिक्षकांना शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागा अंतर्गत, आणि उच्च शिक्षण विभागा अंतर्गत प्रा. शिल्पागौरी प्रसाद आणि प्रा. श्रीनिवास होथा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ५० शिक्षकांची निवड केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील, तीन टप्प्यांमधील कठोर आणि पारदर्शक आणि ऑनलाईन माध्यमातील निवड प्रक्रियेद्वारे त्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेले ५० शिक्षक २८ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेश आणि ६ संस्थांमधील आहेत. निवड झालेल्या ५० शिक्षकांपैकी ३४ पुरुष, १६ महिला, २ दिव्यांग आणि १ CWSN बरोबर कार्यरत आहेत. याशिवाय, उच्च शिक्षण विभागातील १६ शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 16 शिक्षकांना देखील पुरस्कार प्रदान केला जाईल.

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० अनुसार, विद्यार्थी, संस्था आणि व्यवसायाच्या प्रगतीसाठी स्वयं प्रेरित, ऊर्जामय आणि पात्र शिक्षक महत्वाचे आहेत. शैक्षणिक परिसंस्थेमध्ये उत्कृष्टतेची संस्कृती जोपासण्यासाठी पुरस्कार आणि मान्यता यासारखे प्रोत्साहन देखील यामध्ये अभिप्रेत आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आतापर्यंत केवळ शालेय शिक्षकांपुरते मर्यादित होते, मात्र २०२३ या वर्षात, NAT अंतर्गत HEI आणि पॉलिटेक्निक साठी पुरस्कारांच्या आणखी दोन श्रेणी स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा या श्रेणीत निवड झालेले १६ शिक्षक, पॉलिटेक्निक, राज्य विद्यापीठे आणि केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील आहेत.