वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नीट परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर केला आहे. अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. नीट परीक्षेचे पावित्र्य धोक्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा आयोजित केली जाणार नाही, असा निकाल अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
नीट परीक्षा दिलेले विद्यार्थी ‘एक्झाम्स डॉट एनटीए डॉट एसी डॉट इन’ या संकेतस्थळावर जाउन सुधारित निकाल पाहू शकतात. भौतिक शास्त्रातील एका प्रश्नाच्या उत्तराला विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर संबंधित प्रश्नाचे नेमके उत्तर काय, हे शोधून सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आयआयटीला दिले होते. एका प्रश्नाची दोन उत्तरे कशी काय असू शकतात, अशी विचारणा त्यावेळी न्यायालयाने केली होती.
संबंधित प्रश्नाचे एक उत्तर अयोग्य ठरविण्यात आल्यामुळे सुधारित अंतिम निकालात चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची क्रमवारी बदलली जाण्याची शक्यता आहे. यात वाढीव गुण देण्यात आलेल्या ४४ अव्वल विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सुधारित निकाल प्रसिध्द झाल्यानंतर वैद्यकीय समुपदेशन समिती आणि राज्य समुपदेशन मंडळाकडून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन समुपदेशनाची प्रक्रिया सुरु होणार आहे.