शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना मुस्लिम उन्नती सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी
शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून अनेक तक्रारी आहेत. सरकारी नोकरीवर असलेले काही शिक्षक खासगी क्लासेस सर्रासपणे चालवितात, तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांची गुणवत्ता चाचणी घ्यावी. मुस्लीम समाजातील उर्दू शाळेमध्ये मराठीचा प्रादुर्भाव आहे. या शाळेमध्ये मराठी शिक्षकांची परीक्षा घ्यावी, यासह अनेक मागण्या मुस्लीम उन्नती सेवा फाउंडेशनतर्फे करण्यात आल्या आहेत. या संदर्भात मुस्लीम उन्नती सेवा समितीचे उपाध्यक्ष खालिद एस. के. यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेत निवेदन सादर केले.
राज्यातील काही उर्दू शाळांमध्ये मराठी विषयावर फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेक उर्दू शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठीपासून वंचित राहावे लागते. सर्व शाळा व महाविद्यालयात शिक्षकांची वर्षातून दोन वेळेस गुणवत्ता चाचणी घ्यावी. गुणवत्ता चाचणी घेतल्यास बोगस शिक्षक समोर येतील. उर्दू शाळांमध्ये मराठी भाषा शिकविण्यास नकार दिल्यास त्या शाळांवर दंडात्मक कारवाई करावी.
मुलांसाठी ज्या शाळांमध्ये खेळण्यासाठी पुरेसे मैदान नसल्यास त्या शाळांवर कारवाई करावी, जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळेतून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घट होत आहे. काही शाळांमध्ये खोटी पटसंख्या दाखवून शासनाचे कोट्यावधीचे अनुदान लाटले जाते. प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सक्ती करावी. शिक्षकांना खासगी क्लास घेण्यास बंदी घालावी. बहुतेक शाळा महाविद्यालय अनुदानित असूनसुद्धा विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या फी आकारल्या जातात. ते थांबवावे. यासह अनेक मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर शेख अफरोज, खालिद एस. के., अकबर खान, आरिफ खान, शेख सलीम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- जलील शेख